Pune, Water Supply
Pune, Water Supply Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांचे 'ते' स्वप्न नव्या वर्षात तरी पूर्ण होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात (Pune City) गेल्या सहा वर्षांपासून म्हणजे २०१७ पासून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मार्च २०२४ पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल. मीटर बसविण्याचे कामही पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र या योजनेचे काम संपणार कधी, नव्या वर्षात तरी शहरातील सर्व भागाला समान पाणी मिळणार का, असा प्रश्‍न पुणेकरांना पडला आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २०१७ मध्ये १ हजार ९७३ कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. यासाठी शहराची पाच पॅकेजमध्ये विभागणी करून प्रत्येक कामाचे टेंडर काढण्यात आले. यापैकी पॅकेज एक, दोन, तीन आणि पाचमध्ये एल ॲंड टी कंपनीकडून काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२४ पर्यंत आहे, तर पॅकेज चारचे काम हे जैन इरिगेशन या कंपनीकडे आहे.

महापालिका आणि ठेकेदार यांच्यात वाद झाल्याने हे प्रकरण लवादात गेले होते. त्यावर तोडगा निघाल्यानंतर मे २०२२ पासून जैन इरिगेशनकडून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. या पॅकेज चारचे आत्तापर्यंत १२ टक्के काम पूर्ण झाले असून, काम पूर्णत्वासाठी २०२६ उजाडणार आहे.

महत्त्वाची कामे प्रलंबित

या प्रकल्पाचा एकूण गोषवारा पाहिला तर २७९ किलोमीटरची जलवाहिनी टाकणे, ८५ हजार ४५२ मीटर बसविणे, पंप बदलणे अशी कामे बाकी आहेत. हडपसर, मुंढवा, कोंढवा, वानवडी, लष्कर यासह पूर्व पुण्याचा समावेश असलेल्या पॅकेज चारच्या कामाचा भाग सोडला तर पुढील तीन महिन्यांत काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वर्षभरात १०४ किमीची जलवाहिनी अन् ३६ हजार मीटर

पुणे महापालिकेने एप्रिल ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत १०४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकली आहे, तर ३६ हजार १६६ पाण्याचे मीटर बसविले आहेत. प्रमुख्याने पॅकेज चारमधील काम शिल्लक असून, यात अजून २५४ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. मात्र या कामास आणखी अडीच वर्षांची मुदत आहे. पॅकेज एक, दोन, तीन आणि पाचमधील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.

मीटरची संख्या झाली कमी

महापालिकेने योजनेचा आढावा घेतला त्यात पूर्वीच्या नियोजनानुसार ३ लाख १८ हजार पाणी मीटर बसविले जाणार होते. पण ही संख्या कमी झाली असून, आता २ लाख २६ हजार २४२ मीटर बसविले जाणार आहेत. यापैकी १ लाख ४० हजार ७८१ मीटर बसविण्यात आले आहेत. अद्याप ८५ हजार ४५२ मीटर बसविण्याचे काम बाकी आहे. यात पॅकेज चारमधील सुमारे ४५ हजार मीटरचा समावेश आहे.

योजनेची सद्यःस्थिती

पाण्याच्या टाक्यांची संख्या - ८२

बांधून पूर्ण झालेल्या टाक्या - ४८

टाकल्या जाणाऱ्या जलवाहिन्या - ११५५.९४ किलोमीटर

आत्तापर्यंत टाकलेली जलवाहिनी - ८७६.४४ किलोमीटर

बसविण्यात येणारे मीटर - २ लाख २६ हजार

आत्तापर्यंत बसवलेले मीटर - १ लाख ४० हजार

योजनेचे आत्तापर्यंत झालेले काम - ७० टक्के

योजना पूर्ण होण्याची अंतिम मुदत (पॅकेज चार वगळून) - मार्च २०२४

प्रकल्पाची गती

जलवाहिनी (किलोमीटरमध्ये)

एकूण अपेक्षित काम - ११५५.९४

एकूण झालेले काम -७७१.४३

२०२३-२४ मध्ये झालेले काम -१०४.९०

प्रलंबित काम - २७९

कामाची टक्केवारी -७५.८१ टक्के

मीटर बसविणे

एकूण अपेक्षित काम - २ लाख २६ हजार २४३

एकूण झालेले काम -१ लाख ४० हजार ७९१

२०२३-२४ मध्ये झालेले काम -३६ हजार १६६

प्रलंबित काम - ८५ हजार ४५२

कामाची टक्केवारी -६२.२३ टक्के