pune tendernama
पुणे

Pune : मुळा-मुठेतील 'त्या' बंधाऱ्यांवर पालिका का चालविणार हातोडा?

Pune Flood : मागील वर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) एकतानगरी, विठ्ठलवाडीसह काही सोसायट्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुळा-मुठा नदीपात्रातील जुन्या आणि कालबाह्य बंधाऱ्यांचा वापर होत नाही. तेथे गाळ साचल्याने पावसाळ्यात पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पाच बंधारे काढण्यासाठी महापालिकेकडून पुढाकार घेतला जाणार आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) एकतानगरी, विठ्ठलवाडीसह काही सोसायट्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थिती उद्‌भवलेल्या ठिकाणी भेट देऊन पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनास उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर काही प्रमाणात कारवाई करण्यात आली. तसेच, अहवाल तयार करून त्यामध्ये काही प्रमाणात उपाययोजना सुचविल्या होत्या.

दरम्यान, पूरस्थिती उद्‌भवू नये आणि नदीतील पाण्याला अडथळा येऊ नये, यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुठा नदीवर शिवणे, वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट, डेंगळे पूल आणि मुळा नदीवर खडकी, सांगवी या ठिकाणी पूर्वी पाण्याची साठवणूक आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी बंधारे बांधण्यात आले होते.

शहरात मुळा-मुठा नद्यांवर वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात पुलांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे जुन्या बंधाऱ्यांचा वापर थांबला. आता बंधाऱ्यांच्या ठिकाणी गाळ साठून राहत असल्याने पावसाळ्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर बंधाऱ्यांच्या ठिकाणी पाण्याला अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

या कारणांमुळे संबंधित बंधारे काढून टाकण्यासाठी महापालिकेने बंधारे उभारणाऱ्या संस्थांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, जलसंपदा विभागाशी चर्चा करून संबंधित बंधारे काढून टाकण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

देखभाल दुरुस्तीबाबत पुन्हा सूचना...

शहरातील सांडपाणी वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा घेतला. त्यामध्ये देखभाल दुरुस्तीचे काम कमी-जास्त प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले. मात्र, सांडपाणी वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या किमान आवश्‍यक कामांचे प्रमाण निश्‍चित केले आहे. तेवढे काम होणे आवश्‍यक असल्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सध्या नाल्यांना जोडलेल्या पावसाळी वाहिन्या, तुटलेले चेंबर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नागरिकांच्या तक्रारींची, प्रत्यक्षात कार्यवाहीची तुलनात्मक नोंदही ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

शहरातील पूरस्थिती रोखण्यासाठी समितीने दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही झाली आहे. याबरोबरच मुळा-मुठा नद्यांवरील बंधारे कालबाह्य झाल्याने तसेच, पाण्यास अडथळा निर्माण होऊ लागल्याने पाच बंधारे काढले जाणार आहेत. नदीपात्रातील झाडेझुडपेही काढण्यात येतील. यासंदर्भात जलसंपदा विभागाशीही चर्चा केली जाईल.

- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका