Indrayani River
Indrayani River Tendernama
पुणे

Pune : 'या' नदीचे पात्र का होतेय अरुंद? का वाढतोय पुराचा धोका?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे (PCMC) म्हणणे आहे. अशा स्थितीत नदीची पाहणी केली असता आणखी एक गंभीर बाब निदर्शनास आली, ती म्हणजे नदी काठावर टाकला जाणारा भराव. यामुळे मोक्याच्या ठिकाणी नदीचे पात्र अरुंद होताना दिसत असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, नदी काठच्या निवासी भागात भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांचे सानिध्य शहराला लाभले आहे. पवना नदी शहराच्या मध्यातून वाहत आहे. इंद्रायणी नदीमुळे शहराची उत्तर व मुळा नदीमुळे दक्षिण सीमा निश्चित झाली आहे. मुळा नदीचे पात्र व दक्षिण किनारा पुणे महापालिकेच्या तर, इंद्रायणी नदीचा उत्तर किनारा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आहे.

रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करताच पवना नदीत सोडल्यामुळे एका लॉंड्री मालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यापाठोपाठ इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे नदीतील पाणी फेसाळले होते. बर्फासारखे आच्छादन नदीतील पाण्यावर निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीला मिळणारे नाले व सांडपाणी वाहिन्यांची पाहणी केली असता नदी पात्रात काही ठिकाणी भराव टाकला जात असल्याचे आढळले. हा प्रकार नदीच्या दोन्ही काठांवर अर्थात महापालिका व ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत सर्रासपणे सुरू आहे.

कुठे आहे स्थिती?

चऱ्होलीतील दाभाडेवस्ती परिसरात नवीन पुलाच्या दोन्ही बाजूस इंद्रायणी नदीच्या पात्रालगत मातीचा भराव टाकून सपाटीकरण केले जात आहे. असाच प्रकार चोविसावाडी व आळंदीच्या हद्दीतही सुरू आहे. डुडुळगाव ते मोशी दरम्यान, चिखली व मोशी दरम्यानही भराव टाकला जात आहे. चऱ्होलीच्या (खुर्द) हद्दीत एका डेव्हलपर्सने नदी पात्रालगत आरेखन करून प्लॉटिंग केले आहे. हीच स्थिती मरकळ व तुळापूरलगतही आहे.

नद्यांचे प्रदूषण होत आहे. भराव टाकले जात आहेत. त्याविरोधात आळंदीत इंद्रायणी नदीत उतरून आंदोलन केले. त्या माध्यमातून महापालिका, आळंदी नगर परिषद व पीएमआरडीए प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यापुढे त्यांना निवेदन दिले जाणार आहे. प्रदूषण व भराव रोखण्यासाठी जनआंदोलन उभारले जाईल. राजकीय पदाधिकाऱ्यांनी सर्व हितसंबंध बाजूला ठेवून पुढाकार घेऊन नद्यांचा प्रश्न सोडवायला हवा. पूररेषाही निश्चित करावी.

- सुरेश कंक, दिलासा संस्था

इंद्रायणी नदी असो की मुळा व पवना, या नद्यांच्या पात्रांमध्ये किंवा काठावर कोणी भराव टाकत असतील, तर त्याची तक्रार महापालिकेकडे नागरिकांनी करावी. त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथके नियुक्त केले असून, त्यांच्यामार्फत नदीची पाहणी केली जात आहे. प्रदूषण करणाऱ्या ठिकाणांसह भराव टाकताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही पुढाकार घेऊन तक्रारी कराव्यात.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका