पुणे (Pune) : छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी भुयारी रस्त्याचा पर्याय समोर आला. मात्र त्यासाठी टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) शनिवार वाड्याजवळ आणायचे कसे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
त्यातही ही वास्तू हेरिटेज असल्याने १५० मीटर अंतरावर नवीन बांधकामाला परवानगी नाही. १२ मीटर आकाराच्या टीबीएमला जमिनीत उतरविण्यासाठी सुमारे १०० बाय १०० मीटर आवश्यकता आहे. एवढी जमीन शनिवार वाड्याच्या परिसरात नसल्याने पर्यायी जागेचा शोध सुरु आहे.
मध्य पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्याच्या खालून १२ मीटर रुंदीचा भुयारी मार्ग केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकल्पावर काम करून सल्लागार कंपनी वस्तुनिष्ठ अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतरच या प्रकल्पाला मंजुरी मिळणार आहे.
सारसबागेचा पर्याय
नेहरू स्टेडियमच्या डाव्या बाजूची मोकळ्या जागेचा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर सध्या तरी आहे. या जागेतून टीबीएम जमिनीत खोदाई करीत प्रवेश करेल. जमिनीच्या सुमारे ७२ फूट खाली जाऊन भुयारी रस्ता तयार केला जाईल. सारसबाग परिसर ते ओंकारेश्वर मंदिर असा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता करण्याचे प्राथमिक नियोजन आहे.
असा असणार रस्ता
- २२ मीटर अर्थात ७२ फूट जमिनीखालून हा रस्ता तयार करणार
- प्रत्येक रस्त्यावर दोन बोगदे
- भूमिगत रस्त्यावरून दुहेरी वाहतूक
- १२ मीटर रुंदीचा रस्ता असणार
- या रस्त्यावर सुमारे २० हजार दैनंदिन वाहनांची वाहतूक
मध्य पुण्यातील रस्त्यांसाठी लवकरच सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाईल. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ‘टीबीएम’साठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे.
- अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे