पुणे (Pune) : वाघोली येथे डंपरमुळे झालेल्या भीषण अपघातामुळे लोणीकंद (ता. हवेली) येथेही गौणखनिज वाहतूक करणाऱ्या डंपरच्या बेपर्वाईने होणारे अपघात तसेच डंपर वाहतुकीमुळे धूळ व रेतीने घसरड्या झालेल्या हमरस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर लोणीकंद येथील माथ्यावर ये-जा करताना प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. येथील गंभीर अपघातांचा धोका, तसेच प्रदूषणाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवूनही खाण व डंपर चालक-मालक याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ व प्रवासी त्रस्त आहेत.
गौणखनिज वाहतूक करताना ताडपत्रीने झाकलेले नसल्यास डंपरमधून तसेच कच्च्या रस्त्यावरही वाहतुकीवेळी प्रचंड धुळीचे लोट पसरतात. तसेच खाणीकडून वेगात हमरस्त्यांवर येणाऱ्या डंपरमुळे अपघातही होतात.
धूळ उडू नये, यासाठी पाणी मारण्याचे अथवा डंपर वाहतूक करताना ताडपत्रीने झाकण्याची उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे नियम न पाळणाऱ्या क्रशर, खाणी व डंपरचे परवाने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार लोणीकंद ग्रामपंचायतीनेही या व्यावसायिकांना नियम पाळण्याबाबत नोटीस काढली होती.
तहसीलदार, खनिकर्म विभागासह जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले होते. मात्र, तरीही तशीच वाहतूक सुरू असल्याने लोणीकंद ग्रामस्थांनी काही काळ खडी, क्रश सँडची वाहतूक करणारे डंपरही अडविले होते.
धुळीमुळे नागरिकांना श्वसनासह आरोग्याच्या समस्या
खाणपट्टा असलेल्या वाघोली, लोणीकंद, भावडी या परिसरातून वाढत्या नागरिकरणामुळे बांधकामे होत असलेल्या भागात खडी, वाळू व डस्टची मागणी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच या खाणपट्ट्यातून डंपरची वाहतूकही बेसुमार वाढली आहे.
यातील बहुतांश जड वाहने कोणत्याही आच्छादनाविना बेपर्वाईने भरधाव चालत असल्याने उडणाऱ्या धुळीमुळे, तसेच डंपरमागे चालणाऱ्या दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनासह डोळे, घसा, त्वचा विकाराच्या समस्याही वाढल्या आहेत.
यावर उपाय म्हणून बेशिस्त डंपरचालक व दुर्लक्ष करणाऱ्यांवर मालकांवरही कठोर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक कोंडीबरोबरच वाढते अपघात हाही चिंतेचा विषय झाला असून, वाहतूक नियमांच्या पालनासाठी वाहन-चालक मालकांमध्ये स्वयंशिस्तीसाठी जागृती व प्रसंगी कारवाईसाठी प्रशासनासह संबंधित घटकांचा एकत्रित पुढाकार आवश्यक आहे.
- संपतआबा गाडे, जनसेवक, पुणे-अहिल्यानगर रस्ता वाहतूक कृती समिती
वाघोली परिसरात अलीकडच्या काळात बेशिस्त डंपरचालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा घटनेतील दोषींवर कठोर कारवाई गरजेची आहे. डंपर चालकांप्रमाणेच मालकांवरही गुन्हे दाखल झाले, तरच अशा घटनांना आळा बसू शकेल; अन्यथा याविरोधात आंदोलन उभारावे लागेल.
- सर्जेराव वाघमारे, अध्यक्ष, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समिती
वाढते अपघात, तसेच जड वाहतुकीने होणारी कोंडी टाळण्यासाठी चौकाचौकांत वाढीव पोलिस कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच रात्रीचे पेट्रोलिंगही करण्यात येत आहे. थेऊर बाजूकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावरही वाहतूक नियोजनासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. शिवाय जड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा निश्चित करण्यासह काही विशेष उपाययोजना करण्याबाबतही वरिष्ठांशी चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल.
- सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे