Road Work, Contractor Tendernama
पुणे

Pune : ठेकेदाराला दंड करूनही कामाची गती वाढेना; वाहतुकीची कोंडी काही फुटेना

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्त्यांची स्थिती सुधारणार म्हणून महापालिकेच्या पथ विभागाने मोठा गाजावाजा करत प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू केले. पण आता वर्ष होत आले तरी महापालिकेला व ठेकेदाराला हे काम पूर्ण करता आलेले नाही. ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौक, त्रिमूर्ती चौक ते राजमाता अहिल्यादेवी होळकर पूल रस्त्याचे काम रखडले आहे. ठेकेदाराला दंड करूनही कामाची गती वाढत नसल्याने अपूर्ण काम, उडणारी धुळ, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दोन वर्षांपूर्वी महापालिकेने शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी म्हणून ३०० कोटी रुपयांच्या टेंडर काढल्या होत्या. सहा पॅकेजमधून १०० किलोमीटर रस्त्यांच्या डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार होती. पॅकेज एकमध्ये काँक्रिटीकरणासाठी ६५ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. त्यामध्ये आठ रस्त्यांचा समावेश होता.

त्यामध्ये सातारा रस्त्याला समांतर असणारा ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौक हा सुमारे १९०० मिटर लांबीचा रस्ता आणि भारती विद्यापीठाच्या मागचा त्रिमूर्ती चौक ते राजमाता अहिल्यादेवी होळकर पूल या रस्त्याचा समावेश आहे. हा रस्ता कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाला जोडतो.

दक्षीण पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे महापालिकेने या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न कायमचा संपावा, तसेच सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, जलवाहिनी रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित होऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी म्हणून हे काम फेब्रुवारी २०२४ मध्ये हाती घेण्यात आले.

ही दोन्ही कामे संपण्याची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या दोन्ही ठिकाणचे काम जवळपास ठप्पच झालेले आहे. उर्वरित साडेतीन महिन्यांत ५० टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.बैठक

वाहतूक पोलिसांकडून मिळेना परवानगी

कात्रज येथील होळकर पूल येथील काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लवकर परवानगी मिळत नाही. त्यातच कात्रज चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे त्रिमूर्ती चौक ते होळकर पूल या रस्त्यावर आत्ताच काम करता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण या रस्त्याची एक बाजू पूर्ण झाली आहे.

रस्त्यातील सेवा वाहिन्या बाजूला काढणे व नव्या सेवा वाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुसरी बाजूही लवकर पूर्ण होऊ शकते. पण आता कात्रज चौकातील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

स्थानिक नागरिकांकडून अडवणूक

ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौकासाठी २० कोटी रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम ५० टक्क्याच्या जवळपास पूर्ण झाले आहे. पण गणेशोत्सव, नवरात्र त्यानंतर दिवाळी असल्याने रस्त्यावर काम नको. रस्ता मोकळा ठेवा, वाहतूक कोंडी नको, अशा सूचना स्थानिक नागरिकांनी केल्याने काम बंद ठेवावे लागले होते. तसेच काही राजकीय पुढारीही ठेकेदाराची अडवणूक करत असल्याने कामात अडथळे निर्माण झाले आहेत.

विलंबामुळे ठेकेदाराला दंड

या दोन्ही ठिकाणचे काम ठेकेदारांनी संथ गतीने सुरू ठेवल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे ठेकेदाराला वेगात काम करण्याच्या सूचना महापालिकेने दिलेल्या होत्या. तरीही कामात सुधारणा न झाल्याने ट्रेझर पार्क ते मित्र मंडळ चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला एक लाखाचा दंड केला आहे. तर त्रिमूर्ती चौक ते होळकर भुयारी मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ३० हजाराचा दंड केला आहे.

ट्रेझर पार्क ते मित्रमंडळ चौक आणि त्रिमूर्ती चौक ते राजमाता होळकर भुयारी मार्ग या दोन्ही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. पण हे काम करताना स्थानिक नागरिक, पोलिसांची परवानगी, सेवा वाहिन्या स्थलांतरित करणे यासह अन्य अडथळे आल्याने कामाची गती कमी झाली आहे. तसेच नागरिकांना त्रास होत असल्याने ठेकेदाराला दंडात्मक शिक्षाही करण्यात आलेली आहे. ३१ मार्चपर्यंत या कामाची मुदत आहे. येणाऱ्या काळात काम वेगात पूर्ण केले जाईल.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग