पुणे (Pune) : नाताळ सणानिमित्ताने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने एसटी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. पुणे विभागाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता वेळेनुसारच्या गाड्यांसह अतिरिक्त गाड्यादेखील सोडण्याचे नियोजन केले आहे.
पुणे विभागाच्या ताफ्यात सध्या ८७० एसटी बस आहेत, तर ११० अतिरिक्त गाड्या सोडल्या Bus News)
सुट्ट्यांचे औचित्य साधून पालकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. त्यामुळे अनेक जण राज्यातील पर्यटनस्थळांना तसेच, तीर्थस्थळांना भेटी देत आहेत. स्वारगेट बसस्थानकावरून सोलापूर, कोल्हापूर, तुळजापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी जास्त आहे, तर वाकडेवाडी बसस्थानकावरून छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी जास्त आहे.
त्यामुळे प्रशासनाने यांसह अन्य मार्गावर जास्तीच्या गाड्या सोडल्या आहेत. आवश्यकता भासल्यास एसटी गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, असेही एसटी प्रशासनाने सांगितले.
रेल्वेचे प्रवासी ‘वेटिंग’वर
पुण्याहून अमरावती, नागपूर, सोलापूर यांसह लांबपल्ल्यांच्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परिणामी रेल्वे गाड्यांनादेखील ‘वेटिंग’ वाढले आहे.
उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना तर नेहमीप्रमाणे ये-जा सुरू असल्याने त्याचे प्रतीक्षा तिकीटदेखील प्रवाशांना मिळत नाही. यात दानापूर, बिलासपूर, गोरखपूर यांसह गुजरातमध्ये जाणाऱ्या गाड्यांनादेखील प्रवाशांची मोठी गर्दी आहे.
नाताळच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून जास्तीच्या गाड्यांचे नियोजन केले आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे