PMC
PMC Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिकेने का घेतला डांबरी रस्ते कटरने कापण्याच्या निर्णय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती असो किंवा सेवा वाहिन्यांची दुरुस्ती, वर्दळीच्या रस्त्यावर ओबडधोबड खड्डे तयार करून त्यानंतर ते व्यवस्थित न बुजविल्याने वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्याचबरोबर रस्ताही खराब दिसतो.

हे चित्र बदलण्यासाठी आता पुणे महापालिका (PMC) सिमेंटच्या रस्त्यांप्रमाणे डांबरी रस्त्यांवरील तात्पुरत्या कामांसाठी रस्त्यावरील ठराविक भाग कटरच्या साहाय्याने कापून दुरुस्ती करणार आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये विविध प्रकारच्या कामांसाठी रस्त्यांची खोदाई केली जाते. किरकोळ कामांसाठीही रस्त्याचा बराचसा भाग खोदून ठेवला जातो. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची दुरुस्ती व्यवस्थित होत नाही. परिणामी, संबंधित कामाच्या ठिकाणी खड्डा निर्माण होऊन अपघात होतात. शहराच्या वेगवेगळ्या भागांत सध्या महापालिकेच्या पथ विभागाकडून याच पद्धतीने काम केले जाते.

याउलट, सिमेंटच्या रस्त्यावर काम करतेवेळी, रस्त्यावरील कामाचा आवश्‍यक भाग कटरच्या साहाय्याने कापून तेथे काम केले जाते, तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही तेथे तत्काळ दुरुस्ती केली जाते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंते, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

काय होणार फायदा?

- रस्त्यावरील आवश्‍यक तोच भाग कापून तेथे दुरुस्ती होणार

- खोदाईचे काम व्यवस्थित होणार

- रस्त्यावरील अपघाताच्या घटना कमी होणार

- रस्ता खराब दिसणार नाही

रस्त्यावरील विविध प्रकारची कामे झाल्यानंतर खड्डा बुजविला जातो, मात्र संबंधित ठिकाणी रस्ता खराब होतो. त्यामुळे यापुढे डांबरी रस्त्यावरील कामे करताना कटरच्या साहाय्याने रस्त्यावरील ठराविक भाग कापून कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका