Traffic (File) Tendernama
पुणे

Pune : 'या' मार्गांवर का लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शिवणे, उत्तमनगर, शिंदे पूल, वारजे, खडकवासला, कोल्हेवाडी फाटा, किरकटवाडी फाटा, नांदेड फाटा, नांदेड सिटी गेट‌ या ठिकाणी रविवारी (ता. १५) संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

लग्नसराई, रविवारची सुट्टी यामुळे पर्यटकांची झालेली गर्दी झाली होती. तसेच, रविवारी खडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात या परिसरात येतात. पर्यटक दिवसभर येतात परत जाताना मात्र संध्याकाळी सातनंतर एकाच वेळेस जाण्यासाठी गर्दी करतात.

यामुळे खडकवासला धरण चौपाटी खडकवासला गाव कोल्हेवाडी फाटा, किरकटवाडी फाटा, नांदेड फाटा, नांदेड सिटी, प्रवेशद्वार या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

खडकवासला ते नांदेड फाटा यादरम्यान दहा अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता, असे हवेली पोलिस ठाण्याचे‌ हवालदार संतोष तोडकर यांनी सांगितले.‌ खडकवासला, किरकटवाडी परिसरात वाहनांची गर्दी झाल्याने खडकवासला येथील पर्यटक उत्तमनगरकडे वळाले. त्यामुळे कोंढवे धावडे, उत्तमनगर, शिवणे, वारजे मार्गावर वाहनांची संख्या वाढली होती.

भाजी मंडई ते अहिरे गेट दरम्यान असणाऱ्या भाजी मार्केट आणि बाजारपेठेमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवणे येथील नवभारत विद्यालयाच्या चौकात नांदेड सिटीकडून येणाऱ्या वाहनांमुळे या चौकात वाहतूक कोंडी झाली होती. या चौकाच्या दोन्ही बाजूला समोर एक दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचा परिणाम वारजे परिसरात होऊन येथील देखील वाहतूकही संथ झाली होती.

महामार्गावर देखील वाहतूक कोंडी
कात्रज येथील पुलाचे काम सुरू आहे. या चौकातील वाहतूक नवले ब्रिज येथे वळविण्यात आली आहे. यामुळे, नवले ब्रिज परिसरात वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी, शहरात येणारी जाणारी वाहने आता वारजे परिसरातून जात आहेत. संध्याकाळी साडेसहा ते सव्वा सात वाजता वारजे ते नवले ब्रिजदरम्यान महामार्गावर वाहतूक हळूहळू पुढे सरकत होती, असे वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम मिसाळ यांनी सांगितले.