PMP, PMPML Tendernama
पुणे

Pune : पीएमपीला गाळात कोण घालतेय?

PMP Bus : गेल्या ११ वर्षांतील तोटा ९९ कोटी रुपयांवरून ७६६ कोटींवर गेला आहे. याचा सर्वाधिक भार पुणे महापालिकेला सोसावा लागत आहे.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कर्मचाऱ्यांचे वेतन, ठेकेदारांच्या बसचे भाडे आदी कारणांच्या जोडीला बिगर प्रवासी वाहतुकीमुळे पीएमपीची चाके आणखी खोलात गेली आहे. तोटा २४ कोटी ६८ लाख रुपयांनी वाढला आहे, तर संचलनातील तूट ७६६ कोटी रुपयांवर गेली आहे.

पुणे महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक जितेंद्र कोंळबे यांनी २०२३-२४ या वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यातून गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ‘पीएमपी’ला संचलनातील तुटीच्या अनुक्रमे ६० आणि ४० टक्के इतकी रक्कम दिली जाते. गेल्या ११ वर्षांतील तोटा ९९ कोटी रुपयांवरून ७६६ कोटींवर गेला आहे. याचा सर्वाधिक भार पुणे महापालिकेला सोसावा लागत आहे.

पीएमपीच्या आघाडीवर

१२.३९ कोटी किमी ः एकूण धाव

१२.१७ कोटी किमी ः उत्पादित धाव

१३.०५ लाख किमी ः बिगर प्रवासी वाहतूक

२४.६८ कोटी रुपये ः बिगर प्रवासी वाहतुकीमुळे तोटा

८.५४ लाख किमी ः चालक-वाहकांसाठीची वाहतूक

११४.२४ रुपये ः प्रती किलोमीटरचा खर्च

५३.२८ रुपये ः प्रती किलोमीटरचे उत्पन्न

६०.९६ रुपये ः प्रती किलोमीटरचा तोटा

७२६.७८ कोटी रुपये ः २०२२-२३ मधील तूट

४० कोटी रुपये ः तुटीची एका आर्थिक वर्षातील वाढ

तूट वाढण्याचे प्रमुख कारणे

- तिकीटांसह पासची दरवाढ नाही

- तिकीट विक्री व पासच्या उत्पन्नात घट

- तिकीट तपासणीसाठी नेमलेली भरारी पथके सक्षम नाहीत

- उत्पन्न, खर्च, उत्पादित धाव, स्थायी खर्चात कोणतीही बचत नाही

- जुन्या बस सतत बंद पडणे

या गोष्टीही कारणीभूत

- बस सेवा, जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त

- अकरा हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

- सेवकांच्या वेतन वाढीमुळे खर्चात मोठी वाढ

- इंधन, विद्युत पुरवठ्याच्या दरांतही वाढ

- खासगी ठेकेदारांच्या गाड्यांसाठी मोजावे लागणारे भाडे

- अनेक मार्गांवरील सेवा तोट्यात