पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्ते झाडणकाम करण्याच्या टेंडरमध्ये रिंग झाल्याचे समोर आल्याने या टेंडर प्रक्रियेला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी स्थगिती देऊन याची चौकशी सुरू केली आहे. पण त्या चौकशीचा अहवाल अद्याप त्यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सादर केलेला नसल्याने पुढील कारवाई झालेली नाही. (PMC Tender Scam News)
दरम्यान आयुक्त भोसले हे सेवानिवृत्त होणार असल्याने या वादग्रस्त टेंडरचा ‘निकाल’ नवे आयुक्त नवल किशोर राम हेच लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरातील रस्ते, गल्लीबोळ झाडण्यासाठी महापालिकेने १४ क्षेत्रीय कार्यालयांसाठी टेंडर काढले, पण त्यामध्ये जुन्या नियम अटी बदलून नव्या जाचक नियम अटी टाकल्या, तसेच मनुष्यबळ पुरविण्याऐवजी चौरस मीटरनुसार ठेकेदारांनी स्वच्छता करावी. त्यासाठी प्रति चौरस मीटर वार्षिक ५९.४० रुपये इतका दर निश्चित केला.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठराविक ठेकेदारांच्या भल्यासाठी नियम अटी बदलल्या असल्याचे समोर आले. त्यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही टेंडर्स महापालिकेचे आर्थिक नुकसान करणार असल्याचेही समोर आले. याविरोधात आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या. तरीही काही अधिकाऱ्यांनी या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह माजी नगरसेवकांनीही या टेंडर्सची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार पृथ्वीराज बी. पी. यांनी टेंडर प्रक्रियेला स्थगिती देत दोन ते तीन दिवसांत चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल असे सांगितले होते. शुक्रवारी (ता. ३०) भोसले यांच्या कामाचा शेवटचा दिवस आहे, मात्र त्या दिवशी अहवाल सादर होण्याची शक्यता नसल्याने नवीन आयुक्तांच्या न्यायालयात या वादग्रस्त टेंडर्सचा विषय जाणार आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या टेंडर्सची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याचे सांगितले.
स्थगिती उठविण्यासाठी खटाटोप
टेंडर प्रक्रियेवरील स्थगिती उठावी व विषयपत्र स्थायी समितीपुढे सादर व्हावे, यासाठी गेले दोन तीन दिवस महापालिकेत काही माजी नगरसेवकांनी व अन्य व्यक्तींनी खटाटोप सुरू केला होता, पण त्यास यश आले नाही.