pune Tendernama
पुणे

Pune : महापालिकेच्या 'त्या' टेंडरवरून गदारोळ; पुन्हा त्याच ठेकेदारालाच मुदतवाढ

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेतील सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यासाठी सादर झालेल्या टेंडरवरून आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे टेंडरला अद्यापही मान्यता मिळालेली नाही. नवीन टेंडरचे कार्यादेश निघेपर्यंत आता जुन्याच सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ठेकेदारांना मुदतवाढ दिली आहे.

महापालिका प्रशासनाच्या शहराच्या विविध भागांतील आस्थापनांसह महापालिकेची मुख्य इमारत, मंडई, उद्याने, दवाखाने अशा विविध ठिकाणच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर असते. त्यासाठी ठेकेदारांकडील एक हजार ५६५ सुरक्षारक्षकांमार्फत सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जाते.

सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्‍युरीटी, सिंघ इंटेलिजन्स, इगल सिक्‍युरिटी सर्व्हिसेस या तीन कंपन्यांकडून सुरक्षारक्षकांची नेमणूक केली जाते.

दरम्यान, जानेवारीमध्ये संबंधित ठेकेदारांच्या कामाची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. महापलिका प्रशासनाने सध्या नवीन बहुउद्देशीय कामगार पुरवण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. त्यावर अनेक आरोप होऊ लागले होते.

या आरोप-प्रत्यारोपांमुळे एक बैठकही घेण्यात आली होती. त्यास २५ ठेकेदारांनी उपस्थिती लावली होती. या सगळ्या गदारोळामुळे टेंडरला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे यापूर्वी मुदतवाढ मिळालेल्या ठेकेदारांनाच एक एप्रिलपासून नवीन कार्यादेश देईपर्यंत मुदतवाढ दिली आहे.