पुणे (Pune) : पुणे बाजार समितीमध्ये वाहनतळ शुल्काच्या नावाखाली बनावट पावती पुस्तकाद्वारे वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजार समितीच्या बोधचिन्हाचा आणि नावाचाही पावतीवर वापर केला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही टेंडर काढले नसल्याचे समोर आले आहे.
परराज्यातील वाहनांना लक्ष करत १००, १२० ते १५० रुपये आकारत वसुली सुरू आहे. तसेच, परस्पर मासिक पास तयार करून पैसे उकळले जात आहेत. याकडे बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
मार्केटयार्डातील मुख्य बाजारात गूळ भुसार, फळे व भाजीपाला, कांदा-बटाटा शेड, केळी बाजारात येणाऱ्या वाहनचालकांना संबंधित प्रकाराचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवनेरी रस्त्यावरदेखील वाहने लावण्याच्या नावाखाली चालकांना वेठीस धरले जात आहे.
आतापर्यंत बाजार समितीने नेमलेल्या ठेकेदारांकडून लुट सुरू असतानाच आता समितीचा संबंध नसलेल्या लोकांकडूनही खुलेआम वसुली सुरू झाली आहे.
गूळ-भुसार बाजारात वाहन प्रवेशाच्या नावाखाली १० रुपयांऐवजी सरसकट ३० रुपये घेतले जातात तर, फळे-भाजीपाला विभागात परराज्यांतील वाहने लावलेली नसतानाही प्रवेशद्वारावरच पावती देऊन वसुली सुरू आहे. बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांसह अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार घडत असताना ते डोळेझाक करत असल्याचा आरोप काही वाहन चालकांनी केला आहे.
पप्पूभाईच्या नावाखाली वसुली
वाहनतळ शुल्क वसुली करण्याबाबत संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता, आम्ही समितीचे पप्पूभाई यांचे लोक आहोत. त्यांचे याबाबत टेंडर आहे. त्यामुळे हे पप्पूभाई म्हणजे नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हा प्रकार गंभीर असून पैसे वसुल करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परस्पर पैसे वसुल करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला जाईल. आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई होईल.
- डॉ. दिलीप काळभोर, सभापती, बाजार समिती, पुणे
केरळला कांदा घेऊन जाण्यासाठी तीन ट्रक बाजारात आणले. ट्रक बाजारात घेऊन जातानाच वाहनतळ शुल्क म्हणून पावत्या फाडल्या. तसेच प्रवेश शुल्क म्हणून ३० रुपये घेऊन आणखी एक पावती दिली. इतर बाजारांच्या तुलनेने पुणे बाजार समितीत जास्त पैसे घेतले जातात.
- अनुप थॉमस, वाहनचालक, केरळ