Water Tendernama
पुणे

Pune : ऐन उन्हाळ्यात महापालिकेची अघोषित पाणी कपात?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी पाणी कमी पडू दिले जाणार नाही, पाणी कपात लागू होणार नाही, अशी घोषणा केली जात आहे. पण प्रत्यक्षात वडगाव शेरी, एरंडवणे, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडगाव खुर्द या भागासह शहराच्या विविध भागांत पाणी कमी मिळत आहे, अनेक भागांत पूर्णवेळ पाणी असले तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने टाक्या भरत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वीच पुणे महापालिकेने अघोषित पाणी कपात सुरू केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली असून, त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. कोथरूड परिसरात विशेषतः एरंडवणे भागात अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दररोज सकाळी नऊ वाजता पाणी जाते, पण गेल्या काही दिवसांपासून आठ वाजताच पाणी जात आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांनी पर्वती जलकेंद्रातूनच कमी पाणी येत असल्याचे सांगितले आहे. पर्वती जलकेंद्रातून प्रति तास ४१०० क्यूबिक मीटर ऐवजी सध्या ३८०० क्यूबिक मीटर प्रतितास पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी लवकर जात आहे तर, काही भागांत कमी दाबाने पाणी येत असल्याचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सांगत आहेत.

ही अघोषित पाणी कपात आहे काय, याचा खुलासा आयुक्तांनी त्वरित करावा, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे. अन्यथा महापालिकेच्या कारभाराविरोधात हंडा मोर्चा काढण्याचा इशारा खर्डेकर यांनी दिला आहे.

गोखलेनगरमधील नागरिकही त्रस्त

कोथरूड परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे, अशीच स्थिती गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, मॉडेल कॉलनी या भागातही आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. रात्री आठ वाजता पाणी आल्यानंतर रात्री एकपर्यंत पाणी असते, पण पाण्याला दाब नसल्याने टाक्या भरत नाहीत. टाक्या भरल्या तरी नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत जागरण करावे लागत आहे.

याबाबत स्थानिक नागरिक नीलेश तळेगावकर म्हणाले, ‘‘गेल्या आठ दिवसांपासून हा त्रास होत आहे, त्याबद्दल सर्व स्तरावर तक्रारी करून झाल्या, पण सुधारणा झालेली नाही. रात्री उशिरापर्यंत पाणी भरत बसावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा.’’

महापालिकेच्या पीएमएवाय सोसायटीत पाणीटंचाई

वडगाव खुर्द येथे पुणे महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या सोसायटीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मुख्य टाकी पूर्णपणे भरत नसून भीषण पाणीटंचाईला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी सोसायटीमध्ये पाणी जपून वापरण्यासाठी ठरावीक वेळेतच आठ इमारतींमधील ११०० सदनिकांना पाणी दिले जात आहे.

शहराच्या विविध भागांतून पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात बैठक घेऊन पाणीपुरवठ्यात काय अडचणी आहेत, हे लक्षात घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग