पुणे (Pune) : खराडी बायपास ते सोलापूर रस्ता या मुख्य मार्गाचा वापर पार्किंगसाठी केला जात आहे. काही बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करत असल्याने येथी वाहतूक कोंडी होते. अशांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. पोलिसांना कारवाई करून येथील पदपथ व रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
या मुख्य रस्त्यावर असलेले रुग्णालय, बँका, कार व दुचाकी व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी पार्किंगची सुविधा उपलब्ध केलेली नसल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक रस्त्यावर जागा दिसेल तेथे वाहन उभे करीत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त पार्किंगमधून वाट काढताना धडपडणारे पादचाऱ्यांना त्रास होत असतानाही ही समस्या सोडवण्यासाठी पोलिस प्रशासन पुढाकार घेत नाही. खराडीतील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ पदपथ व रस्त्यावर दुचाकीस्वारांनी अतिक्रमण सुरू केल्याने रस्त्याची पायवाट झाली आहे. रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक राजाराम वाघ यांच्यासह अनेकांकडून होत आहे.
खराडीत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व वाहनतळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अनेकदा वाहनधारकांना रस्त्यावरच वाहने उभी करतात आणि त्यामुळे कोंडीची समस्या उद्भवते. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पोलिसांकडून यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- मनिषा सुरवसे, स्थानिक नागरिक
रस्त्यावर दुचाकी व चारचाकी लावली, तर पंधरा-वीस मिनिटांमध्ये वाहतूक पोलिसांचा फिरता टेम्पो येईल आणि गाडी उचलून नेईल असा समज सर्वसाधारणपणे वाहनचालकांचा असतो. खराडीमध्ये मात्र हा समज चुकीचा ठरत आहे. येथे पोलिसांची यंत्रणाच अपुरी असल्यामुळे वाहनचालक बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने लावतात.
- सुहास नेवसे, स्थानिक नागरिक
खराडी बायपास ते सोलापूर रस्ता या मुख्य व अंतर्गत मार्गांवर अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. चालकांनी रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
- प्रशांत किरवे, पोलिस निरीक्षक, चंदननगर वाहतूक शाखा