Pothole
Pothole Tendernama
पुणे

Pune: पुणेकरांचा यंदाचा पावसाळाही 'खड्ड्यां'तच; हे आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्ते डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणासाठी महापालिकेने ३०० कोटींचे टेंडर काढले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून रस्त्याची कामे सुरू असून, केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. आता पावसाळ्यात डांबरीकरण करणे शक्य नसल्याने पुणेकरांना यंदाही खड्ड्यातून प्रवास करावा लागेल असे स्पष्ट होते.

गेल्या तीन वर्षांपासून शहरात समान पाणीपुरवठा, विद्युत वाहिनी, मलवाहिनी, पावसाळी वाहिनी, मोबाईल कंपन्या यांच्यासह इतर कामांसाठी रस्ते खोदकाम सुरू आहे. खोदकाम व्यवस्थित न बुजविल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, खड्डे पडल्याने चाळण झाली आहे. महापालिकेच्या या कारभाराविरोधात टीका झाल्यानंतर ३०० कोटी रुपये खर्च करून सर्व रस्ते चकाचक केले जातील, अशी घोषणा महापालिकेने केली.

त्यासाठी सहा पॅकेजमध्ये टेंडर काढण्याचा निर्णय झाला. पॅकेज एकमध्ये आठ रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार होते. यातील प्रभात रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला नागरिकांनी विरोध केल्यामुळे डांबरीकरण केले. या पॅकेजमधील बिबवेवाडी मुख्य रस्ता, महादजी शिंदे रस्ता औंध, विश्रांतवाडी चौक येथे काम सुरू आहे.

आतापर्यंत केवळ ०.१० टक्केच काम झाले आहे. पॅकेज दोन आणि तीनमध्ये ४८.२५ किलोमीटरचे रस्ते केले जाणार होते. या दोन्ही पॅकेजचे काम सुमारे ६० कोटींचे आहे. या दोन पॅकेजमध्ये फेब्रुवारीपासून ४०.३१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही सुमारे १६ किलोमीटरची कामे शिल्लक आहेत.

मध्यवर्ती भागातील रस्ते खराबच

पॅकेज चार आणि पाचमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याने या निविदा रद्द कराव्या लागल्या. परिणामी, या कामाला तीन महिने विलंब झाला. त्यात आता पावसाळा सुरू होईल, असे असताना मध्यवर्ती भागासह उपनगरांतील ४१.२१ किलोमीटरचे काम झालेले नाही. यामध्ये मध्यवर्ती पेठा, कोथरूड, बावधन, विमाननगर, धानोरी, कात्रज, कोंढवा, फुरसुंगी, धायरी यासह इतर भागातील रस्त्यांचा समावेश आहे. पॅकेज चार हे ५६.६७ कोटींचे असून, पॅकेज पाचमधील रस्त्यांसाठी ५४.४९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कामाची स्थिती

(पॅकेज क्र. - अपेक्षित काम (किमीमध्ये) - झालेले काम किमीमध्ये)

एक - ८.२ - ०.१०

दोन - २०.८८ - १६.९०

तीन - २७.३८ - २३.४१

चार - २१.९० -०.८०

पाच - २२.२२ - ००

पॅकेजनिहाय रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे. ४० किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्‍व‍भूमीवर रस्त्यांची कामे वेगात करावेत असे आदेश दिले आहेत.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका