पुणे (Pune) : पुण्यातील ज्या प्रसिद्ध ठिकाणांमुळे या शहराला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे त्यापैकी एक आहे शनिवारवाडा (Shaniwarwada). पेशव्यांनी बांधलेला हा वाडा पाहण्यासाठी आजही मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. इतिहासात प्रसिद्ध असलेल्या वाड्यामुळे पुणेकरांची वेगळीच अडचण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना चक्क रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. (Residents living near Shaniwarwada demanded relaxation in no-development rules news)
ऐतिहासिक शनिवरवाड्याच्या शंभर मीटर परिसरात बांधकामांवर बंदी आहे. त्याचबरोबर वाड्यापासून तीन मीटर अंतरापर्यंत बांधकाम करावयाचे असल्यास त्यासाठी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शनिवारवाड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जुने वाडे, इमारती आहेत. त्यापैकी अनेक वाडे, इमारती जुन्या झाल्या असून, काही तर धोकादायक स्थितीत आहेत. मात्र बांधकाम करण्यासाठी असलेल्या अटींमुळे हे वाडे आणि इमारतींच्या दुरुस्तीमध्ये, तसेच त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
त्यामुळे इतिहासात प्रसिद्ध असलेल्या शनिवारवाड्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नव्याने बांधकाम करणे किंवा दुरुस्ती करणे अवघड बनले आहे. ऐतिहासिक वास्तुंच्या परिसरात बांधकाम करण्यावर अनेक नियम व अटी आहेत. परिणामी या भागातील अनेक इमारती जुन्या झाल्या असल्या तरी त्यांची दुरुस्ती करणे किंवा त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करणे अवघड बनले आहे. परिणामी या परिसरात नियमांमध्ये सवलत देण्याची रहिवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे.
शनिवारवाड्याच्या शंभर मीटर परिसरात असलेली बंदी आणि तीन मीटर अंतरापर्यंत ना हरकत प्रमाणपत्र घेऊन बांधकाम करण्यास असलेली अट रद्द करावी या मागणीसाठी शनिवारवाडा परिसर हेरिटेज ग्रस्त समितीच्यावतीने रविवारी (ता. १५) घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या वेळी समितीचे अध्यक्ष सुनील तांबट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मयुरेश पवार, गणेश नलावडे, संजय फेंगडे, कुंदन तांबट, अनुपमा मुजूमदार, स्वप्नील थोरवे, अनिल खराडकर, मुकुंद चव्हाण, अनिल दिवाणजी, सुरेश पिंपळे, संजय आगरकर, किरण शेटे, रजनीकांत वेर्णेकर, सचिन धाडवे, उषाताई मोरे, विशाल मोरे आदी उपस्थित होते.
शनिवारवाड्याच्या परिसरात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘भीक नको, हक्काचे घर हवे’, ‘कसब्यात मेट्रो होऊ शकते, तर आमचे घर का नाही’, ‘आमच्या पाच पिढ्या येथे राहत आहेत, हा काय आमचा गुन्हा आहे का,’ असे फलक आंदोलनकर्त्यांनी हाती घेतले होते.
या वेळी समितीचे अध्यक्ष तांबट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्या काळापासून येथे राहत आहोत. आम्ही मुळचे पुणेकर रहिवासी असून, चुकीच्या कायद्यामुळे आज विस्थापित होण्याची वेळ आमच्यावर आली आहे. येथील वाडे मोडकळीस आले आहेत. वाड्यांचा पुनर्विकास करून शकत नाही आणि बाहेर सदनिका घेणे परवडत नाही, अशा कात्रीत आम्ही अडकलो आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा आणि बांधकामावरील बंदी हटवावी.
पुणेकरांच्या या मागणीवर प्रशासनाकडून काय पावले उचलली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशीच मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली तर शासकीय स्तरावर त्याची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक किचकट बनला आहे.