Pune Tendernama
पुणे

Pune : शिवाजीनगरमधील वाहतूक कोंडीची कटकट लवकरच संपणार; 'हे' आहे कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शिवाजीनगर परिसरातील वाहतूक लवकरच सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे आनंदऋषिजी चौक (विद्यापीठ चौक) ते रिझर्व्ह बँकेपर्यंतचा रस्ता महापालिकेने ४५ मीटर रुंदीचा केला आहे. त्याच प्रमाणे आता रिझर्व्ह बँक ते संचेती रुग्णालय हा सुमारे पावणे दोन किलोमीटरचा रस्ताही ३६ मीटरवरून ४५ मीटरचा करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

या रस्त्यावर इस्क्वेअरपासून विद्यापीठाच्या पुढे पाषाण रस्ता व बाणेर रस्त्यावर उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने गेल्या वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रिया राबवली. खासगी बंगले, इमारती, शासकीय संस्था यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून रस्ता रुंदीकरणावर भर देण्यात आला. या कामामुळे सध्या वाहतूक कोंडी होत असली तरी पुढील एका महिन्यात रुंदीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.

या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच आढावा घेतला. सध्या मेट्रोचे काम सुरु आहे तर याच वेळात रिझर्व्ह बँक ते संचेती रुग्णालयापर्यंतचा रस्ताही रुंद करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार कामाला वेग आला आहे. या भागात आकाशवाणी, एलआयसी, कृषी महाविद्यालय, पोलिस मुख्यालय, शिमला ऑफिस, सीओईपी वसतीगृह, पेट्रोलपंप यांसह सुमारे ४० जागांचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने जागा मालकांना नोटीस देणे सुरु केले आहे.

विद्यापीठ भागातील काम संपल्यानंतर हे काम सुरु केले जाईल. त्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

हे होणार फायदे

- रस्ता दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ४.५ मीटरने वाढणार

- शिवाजीनगर या गर्दीच्या ठिकाणी रस्ता मोठा झाल्याने वाहतूक सुरळीत होणार

- गणेशखिंड रस्त्यावर तीन समतल विलगक प्रस्तावित आहेत, त्यामुळे सेवा रस्त्यांना पुरेशी जागा मिळेल

गणेशखिंड रस्त्यावरील रिझर्व्ह बँक ते संचेती रुग्णालयापर्यंतच्या रस्त्याचेही रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. काही जागामालकांनी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. हे काम झाल्यास संपूर्ण गणेश खिंड रस्ता ४५ मीटर रुंदीचा होणार आहे.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका