Nitin Karir
Nitin Karir Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांच्या 'या' जिव्हाळ्याच्या प्रकल्पाबाबत पुणे महापालिका अंधारात

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बालगंधर्व रंगमंदिराची जुनी झालेली इमारत पाडून तेथे नव्याने नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव गेल्या दीड वर्षापासून अडगळीत पडलेला असताना आता मात्र, पुनर्विकासावर शिक्कमोर्तब झाले आहे.

‘‘बालगंधर्व रंगमंदिराचा नवा आराखडा ठरला असून, पुढील काही दिवसांत ही वास्तू पाडून येथे भव्य नवे नाट्यगृह व कलादालन उभारले जाईल,’’ याचे सूतोवाच राज्याने नवे मुख्य सचिव नितीन करीर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले.

‘‘राज्याचा मुख्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि माझ्या अनेक आठवणी आहेत. आता बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचा आराखडा देखील ठरलेला आहे. येत्या काही दिवसांत ही वास्तू पाडली जाईल. येते भव्य नाट्यगृह, कलादालन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. तरी बालगंधर्वच्या विकासात आजवर अनेक अधिकाऱ्यांनी योगदान दिले आहे. मात्र आता ही वास्तू पाडली जाणार आहे, यात पुन्हा मला येता येणार नाही. त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे हे देखील एक कारण आहे’’, असे करीर यांनी बालगंधर्व रंगमंदिरातील भाषणात सांगितले.

प्रस्ताव अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत
नव्या इमारतीमध्ये एक हजार, ५०० व ३०० या क्षमतेची तीन नाट्यगृहे असतील. दोन कला दालने, दोन खुले सभागृह, वाहनतळ याचा समावेश आहे. कला, संस्कृतीचा वारसा सांगणारे सुशोभीकरण, उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, बालगंधर्वचे वैशिष्ट्यपूर्ण व सांस्कृतिक राजधानीचा वारसा सांगणारे प्रवेशद्वार, नैसर्गिक हवा आणि प्रकाश यावरही भर देणारा आराखडा तयार करण्याचे काम दिला जाणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सुधारित पुनर्विकास महापालिका प्रशासनाने सुरू केले होते. मात्र, यास प्रस्तावास अंतिम मान्यता मिळालेली नाही.

पुणे महापालिका अंधारात
नितीन करीर यांनी पुण्यात येऊन बालगंधर्व रंगमंदिराची इमारत पाडणार अशी घोषणा केली. पण याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आमच्या पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच पुनर्विकासाच्या आराखड्यावरही कोणतेही काम सुरू नाही, असे सांगितले. त्यामुळे महापालिका प्रशासन याबाबत अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशी आहे शक्यता
- पुढील काही दिवसांत बालगंधर्व रंगमंदिराचा आराखडा राज्य सरकारकडूनच पुणे महापालिकेला मिळणार
- जिओ मॉलची पाहणी केल्यानंतर तयार केलेला आराखडाही अंतिम होण्याची शक्यता
- लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जुनी झालेली इमारत पाडण्याच्या कामास सुरुवात
- त्यापूर्वी सर्व परवानग्या घेतल्या जाणार
- इमारत पाडल्यानंतर पुढील किमान तीन वर्ष नवीन वास्तू तयार होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता