पुणे (Pune) : कात्रज घाटातील उपाययोजना आणि सुरक्षिततेबाबत नागरिकांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत नागरिक, वाहनचालक आणि पर्यावरणप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सरकार संपूर्ण देशात, महाराष्ट्रात दळवळण सुधारत आहे. मग हा ऐतिहासिक कात्रजचा घाट का सुधारत नाही. रुंदीकरण, पथदिवे या प्रश्नांकडे का लक्ष दिले जात नाही, अशा शब्दांत नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
घाटाच्या पलीकडील बाजूस अतिक्रमणे होत आहेत. वन्यजीवांना पाण्याची सोय नाही. रस्ता रुंदीकरणासाठी परवानगी देण्यात येत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, वणव्यांची समस्या उद्भवत आहे. मात्र वनविभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. प्रत्येक प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. यावर सर्व विभागांनी आणि सरकारने लक्ष घालत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शिवभंभू प्रतिष्ठान संस्थापक महेश कदम यांनी म्हटले आहे.
संरक्षक कठड्यांची उंची वाढवा
वन विभागाने डोंगरावर ठिकठिकाणी पाणवठे केले तर वन्यजीव पाण्यासाठी रस्त्यावर येणार नाहीत. वणवे लागले तर पाणी वापरता येईल. संरक्षक कठडे उंचीचे असावेत. रिफ्लेक्टर व रेडियम फलक असले तर अपघातांची शक्यता कमी होईल, अशी सूचना हेमंत धायबर यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व महापालिकेच्या समन्वयचा अभाव कात्रज घाटाच्या बाबतीत सातत्याने दिसून येत आहे. घाटामध्ये वणवा लागण्याच्या घटना वाढत आहेत, कचऱ्याची समस्या मोठी आहे, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक नरेंद्र शिंदेकर यांनी म्हटले आहे.
घाट रस्त्याचे रुंदीकरण करा
कोंढव्यातील बोपदेव घाट दुर्घटनेनंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याची स्थिती असल्याचे श्रीराम कुलकर्णी यांनी म्हटले, तर कात्रज घाटातील रस्ता रुंद केला तर दगड निसटणे, देखभाल व दुरुस्ती असे प्रश्न राहणार नाहीत. प्रशासनाला कायमचा प्रश्न सोडवायचा आहे की, भिजत घोंगडे ठेवायचे आहे हेच कळत नसल्याचे राजेश कदम यांनी सांगितले.
कात्रज घाटातील पावसाळी वाहिन्या सुस्थितीत हव्यात. पोलिस चौकी सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे बोपदेव घाटासारख्या घटना होणार नाहीत. पुण्याचे हे दक्षिण प्रवेशद्वार स्वच्छ, सुंदर असावे, नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांनाही या चांगल्या कामात कसे सहभागी करून घेता येईल, याचा प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे.
- शाम मरळ, रहिवासी