Pollution Tendernama
पुणे

Pune : 'त्या' निर्णयाने बांधकाम व्यावसायिकांचे दणाणले धाबे; मग महापालिकेचे घुमजाव का?

PMC : बांधकाम विभागाने गेल्या वर्षी धूळ कमी करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या, पण कडक नसल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बांधकाम करताना धुळ रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याने बांधकाम प्रकल्पांना नोटिसा पाठवून पुणे महापालिकेने (PMC) एकाच दिवशी ९१ ठिकाणचे काम बंद पाडले.

या कडक कारवाईमुळे खळबळ उडाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १३) मात्र कारवाई थंडावली. केवळ १४ बांधकाम प्रकल्पांना काम थांबविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. रेडीमिक्स सिमेंट प्रकल्पांसह पायाभूत सुविधांच्या विविध कामांमुळे शहरात सर्वत्रच धुळीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यातच हिवाळ्यात जास्त त्रास होत असल्याने बांधकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.

बांधकाम विभागाने गेल्या वर्षी धूळ कमी करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या, पण कडक नसल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे या वर्षी थेट बांधकाम थांबविण्याच्या नोटीस देण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

बांधकामावरील स्थगितीमुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषण महामंडळाच्या नियमांचे पालन करणे बांधकाम व्यावसायिकांना आवश्‍यक ठरले आहे.

शहरात सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त बांधकाम प्रकल्प सुरु आहेत. गुरुवारी (ता. १२) पहिल्या दिवशी १५८ जणांना नोटिसा देण्यात आल्या. त्यापैकी ९१ प्रकल्पांना थेट काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले. ही मोहीम कायम सुरु राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

मात्र पर्वती, स्वारगेट, बिबवेवाडी, धनकवडी या भागांचा समावेश असलेल्या विभाग क्रमाक पाचमध्ये बांधकामाबाबत तुलनेने सौम्य भूमिका घेत पहिल्या दिवशी ६७ नोटीस बजावल्या, पण त्यात काम थांबविण्याची एकही नोटीस नव्हती. आज सुद्धा एकालाही अशी नोटीस बजावण्यात आलेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने अभियंते कार्यालयात होते. त्यामुळे नोटिसा कमी दिल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी थांबविलेली बांधकामे

विभाग एक ः ८

विभाग दोन ः ०

विभाग तीन ः ४

विभाग चार ः ०

विभाग पाच ः ०

विभाग सहा ः २