SPPU
SPPU Tendernama
पुणे

Pune: विद्यापीठ चौकातील कोंडी 2 दिवसांत फुटणार, कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (SPPU Chowk)) वाहतूक कोंडी (Traffic Jam) कमी करण्यासाठी औंधकडून (Aundh) येणारी वाहतूक आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (SPPU) वळविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, येत्या दोन-तीन दिवसांत हा रस्ता खुला करण्यात येणार आहे.

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे (Metro) काम सुरू असून, येत्या काही दिवसांत दुमजली उड्डाणपुलाचेही (Flyover) काम सुरू होणार आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत (वॅम्निकॉम) नवीन रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाने (पुम्टा) मान्यता दिली होती. परंतु, या कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मंजुरीची आवश्यकता होती.

या संदर्भात पाटील यांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासमवेत चर्चा केली.

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले. तसेच, या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेकडूनही नुकतेच काही पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

विद्यापीठ चौकातील विकासकामे पूर्ण होण्यास सुमारे १० महिन्यांचा कालावधी लागेल. विद्यापीठाच्या मिलेनियम गेटमधून ‘वॅम्निकॉम’पर्यंतचा नवीन रस्ता तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. या मार्गाचा वापर करून वाहनचालकांना रेंजहिल्सकडेही जाता येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा