मुंबई (Mumbai): महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाकांक्षी रस्ते निर्मितीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे-शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'डबल डेकर' रचनेसह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना (DMIC) थेट जोडणाऱ्या सहा पदरी रस्त्यांच्या कामांना तत्काळ सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे ते शिरूर या ५३.४ किलोमीटरच्या अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम आता युद्धपातळीवर सुरू होणार आहे. या मार्गावर भविष्यातील वाहनांची वाढती संख्या आणि औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन, वाहतुकीला गती दिली जाणार आहे.
या प्रकल्पामध्ये चार पदरी जमिनीला समांतर (ॲट ग्रेड) मार्ग आणि सहा पदरी उन्नत (एलिव्हेटेड) महामार्ग अशा दुहेरी रचनेला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे काम तीन वर्षांच्या विहित कालावधीत पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली आहे, जेणेकरून कामात कोणतीही दिरंगाई होणार नाही.
या मार्गावरील ३५ किलोमीटर उन्नत महामार्गापैकी, ७.४० किलोमीटर लांबीच्या एका विशेष भागात अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना साकारणार आहे. येथे जमिनीला समांतर रस्ता, त्यावर उन्नत रस्ता आणि त्याहीवर मेट्रो मार्ग अशा स्वरूपाच्या 'व्हाया डक्ट'ची निर्मिती केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी कामासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे-शिरूर प्रमाणेच, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या दोन प्रमुख रस्त्यांच्या निर्मितीलाही मंजुरी मिळाली आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत या ३२.८ किलोमीटर लांबीच्या मार्गासह बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग) या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणार आहे.
हे दोन्ही प्रकल्प दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (DMIC) क्षेत्रातील उद्योगांना मोठी चालना देतील. मुख्यमंत्र्यांनी या कामांसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
याव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीनगर - जालना डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन 'ग्रीनफिल्ड' (संपूर्ण नवीन) रस्त्याच्या आखणीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्राला थेट 'समृद्धी' महामार्गाचा लाभ मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर दरम्यान असलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा त्रास कमी करण्याचेही निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी या बैठकीस उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी सादरीकरण केले.