पुणे (Pune): राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या रिंगरोडच्या नऊही टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. पश्चिम टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) महामंडळाकडे वर्ग केलेल्या ३१ किलोमीटर रिंगरोडच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्याचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महामंडळाकडून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत हे काम केले जात असून पश्चिम टप्प्याचे काम सुमारे २० टक्क्यांपर्यंत झाले आहे. पावसाळा संपल्यामुळे या कामाला वेग आला असून मे अखेर महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पश्चिम टप्प्यातील रस्त्याच्या कामासाठी डिसेंबर २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. त्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वसईकर यांनी दिली. पूर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२८ पर्यंत मुदत दिली आहे. त्यावेळी संपूर्ण रिंगरोड पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘एनएचआय’ने पूर्वेकडील टप्प्यात पुणे- छत्रपती संभाजीनगरदरम्यान ग्रीन कॉरिडोरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे नगर रस्त्यापासून सोलापूर रस्त्याला आणि पुढे पुणे-बंगळूर मार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडचे ३१ किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. परंतु मध्यंतरी प्राधिकरणाने यात बदल करत हे काम महामंडळानेच करावे, असे सुचविले.
त्यानुसार हा रस्ता महामंडळाकडे वर्ग केला आहे. महामंडळाने यासाठी स्वतंत्र टेंडर काढल्या होत्या. मात्र, त्या ३५ टक्के जादादराने आल्यामुळे त्या रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी आता फेरटेंडर काढल्या आहेत. टेंडर अंतिम करून त्याचे कामही सुरू करणार असल्याचे राहुल वसईकर यांनी सांगितले.