PMP
PMP Tendernama
पुणे

Pune: धोकादायक बनलेल्या PMP बसेसमधून पुणेकरांचा प्रवास

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : काही बसच्या (PMP Buses) फ्लोरिंगचा पत्रा फाटला आहे, तर काही बसला तडे गेले आहेत. काहींना दरवाजे नाहीत, तर बीआरटीमधून (BRT) धावणाऱ्या बसचे दरवाजे तुटलेले आहेत. पुण्यातील वाहतुकीचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीच्या बसमध्ये सुमारे वीस उणिवा आढळून आल्या आहेत. यातील काही उणिवा थेट प्रवाशांच्या जिवावर बेतणाऱ्या आहेत. तरी देखील पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सुमारे आठवडाभर केलेल्या सर्वेक्षणातून पीएमपीच्या बस प्रवाशांसाठी ‘अनफिट’ असल्याचा दावा आप, प्रवासी मंचने केला आहे.

आप, पीएमपी प्रवासी मंचच्यावतीने मागील आठवड्यापासून पीएमपीच्या विविध मार्गावर धावणाऱ्या बसची पाहणी केली. त्यात बस मधील सुमारे २० उणिवा प्रकर्षाने दिसून आल्या. यासाठी पुणे महापालिका, कात्रज व स्वारगेट डेपोत जाऊन बसची पाहणी केली.

सुमारे ७४ बसची एकदम बारकाईने पाहणी करून त्याचा अंतरिम अहवाल पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना सादर करण्यात आला. यावर बकोरिया यांनी त्वरित करवाईचे आदेश दिले आहेत.

प्रामुख्याने आढळलेल्या उणिवा
१. बसच्या फ्लोरिंगचा पत्रा तुटलेला
२. बसमधील कॅमेरा बंद
३. स्पिडो मीटर बंद
४. कालबाह्य झालेली अग्निशमन उपकरणे
५. बैठक व्यवस्थेला कुशन नाही
६. प्रथमोपचार पेटी नाही
७. खिडक्यांची तावदाने तुटलेली
८. बसच्या पुढच्या बाजूला दरवाजा नाही
९. बीआरटी मधून धावणाऱ्या बसचे दरवाजे तुटलेले
१०. हॉर्न वाजत नाही
११. रूट इंडिकेटर बंद

आम्ही १ आठवडा तीन डेपोत फिरून विविध बसची पाहणी केली. त्यावर आधारित एक अंतरिम अहवाल तयार केला असून तो पीएमपी प्रशासनाला सादर केला आहे. अहवालात मांडलेल्या उणिवा दूर केल्यास प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.
- चेनथील अय्यर, आप (पीएमपी प्रकल्प विभाग प्रमुख), पुणे

पीएमपीला अहवाल प्राप्त झाला असून बसमधील उणिवा दूर करण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. प्रवासी सेवा सुधारण्यावर कायमच भर राहिला आहे.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पुणे