Pune Traffic
Pune Traffic Tendernama
पुणे

Pune : पुणे महापालिकेची 'ती' चूक दुचाकीस्वारांच्या मुळावर; का वाढले अपघात?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कचरा गाड्यांमधून रस्त्यावर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त चिकट पाण्यामुळे (लिचेट) रस्ते निसरडे होऊन दुचाकी घसरून नागरिक जखमी होत आहेत. पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन तसेच पथ या विभागांच्या दुर्लक्ष तसेच ढिसाळ कारभारामुळे कचरा संकलन केंद्राजवळील रस्त्यांवर अपघात वारंवार घडत आहेत. परिणामी दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आला आहे.

घरोघरी जमा केलेला कचरा छोट्या घंटागाड्यांधून कचरा संकलन केंद्रांवर आणला जातो. तेथून तो मोठ्या गाडीत टाकून रॅम्पवर एकत्रित केला जातो. नंतर डंपर किंवा हायबा टीपरमधून कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेला जातो. शहरात अशाप्रकारे ६५० पेक्षा जास्त गाड्यांमधून शेकडो टन कचऱ्याची वाहतूक केली जाते.

घंटागाडी किंवा डंपरमधून ओला कचरा घेऊन जाताना ‘लिचेट’ रस्त्यावर सांडते. विशेषतः कचरा संकलन केंद्र व रॅम्पच्या प्रवेशद्वारासमोरील अर्धा ते एक किलोमीटर परिसरातील रस्ते सर्वाधिक निसरडे झालेले आहेत.

पुण्यात (शुक्रवारी) सकाळी पाऊस पडल्यानंतर अनेक रस्ते आणखी निसरडे झाले. कोथरूड कचरा डेपो ते वनाज या दरम्यान सकाळी अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. त्यांच्या हातापायाला जखमा झाल्या. सुदैवाने सकाळच्या वेळी वाहनांची संख्या कमी असल्याने मोठा अपघात झाला नाही.

इतरवेळी टँकरमधून रस्त्यावर पाणी पडल्याने रस्ते निसरडे झालेले असतात. पण घनकचरा आणि पथ या विभागांच्या दुर्लक्षाचे दुष्परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत.

महापालिकेवर कारवाई कोण करणार?

नागरिकांनी शहरात घाण केली की महापालिका दंड ठोठावून शिक्षा देते. बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्यासाठी घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांना खास पिवळ्या रंगाची जीप देण्यात आली आहे, पण प्रचंड दुर्गंधी पसरविणारे ‘लिचेट’ सांडत जाणाऱ्या, अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या गाड्यांमुळे महापालिकेवर कोण कारवाई करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

'या' ठिकाणी आहेत रॅम्प

कात्रज, घोले रस्ता, हडपसर, औंध, येरवडा, बंडगार्डन, कोथरूड अशा सात ठिकाणी रॅम्प आहेत. दोन ते तीन क्षेत्रीय कार्यालयांचा कचरा एकत्र जवळच्या रॅम्पवर आणला जातो.

कोथरूड डेपो परिसरात पाऊस पडल्यानंतर रस्ते निसरडे झाले. त्याबाबत पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून रस्त्याचा निसरडेपणा कमी करणार आहेत. कचरा संकलन केंद्र, रॅम्पच्या परिसरात रस्ते वारंवार स्वच्छ करून घ्यावेत अशी सूचना दिली आहे.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग