PMP Tendernama
पुणे

Pune : 'पीएमपी' ठरणार देशातील पहिलीच सार्वजनिक वाहतूक संस्था! काय आहे प्रयोग?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवासी वाहतुकीचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच, प्रवाशांची सुरक्षा व संख्या मोजण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासन बसमध्ये (PMP Bus) ‘एआय’ आधारित कॅमेराचा (AI Camera) वापर करणार आहे. त्यासाठी पुण्यातील विविध मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये कॅमेरे बसवून त्याची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे.

‘पीएमपी’ प्रशासनाने सर्व बसमध्ये कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला आहे. लवकरच त्यासंदर्भात दिल्लीत सादरीकरण होणार आहे. यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित असून, रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी उपलब्ध केल्यानंतर बसमध्ये कॅमेरे बसविले जातील.

प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्यासाठी ‘पीएमपी’ने हा हायटेक मार्ग स्वीकारला आहे. प्रत्येक बसमध्ये दोन कॅमेरे बसविले जाणार आहे. एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ लावण्यात येईल. त्यामुळे चालकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. दुसरा कॅमेरा हा बसमधील शेवटच्या भागात असणार आहे. प्रवाशांची संख्या मोजण्यासाठी याचा वापर होईल.

‘पीएमपी’च्या स्वतःच्या व ठेकेदारांच्या दोन्ही बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविले जाणार आहे. जर असे झाले तर, सार्वजनिक वाहतूक बसेसमध्ये ‘एआय’ वापरणारी ‘पीएमपी’ ही देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था असेल.

‘एआय’चा वापर का?

- महत्त्वाच्या मार्गावर विशेषतः रात्रीच्यावेळी प्रवाशांची मोठी गर्दी असते.

- काही प्रवासी गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करतात.

- ‘एआय’ कॅमेरा प्रवाशांची संख्या मोजून त्याचा संदेश वाहकाला देईल.

- त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्याला चाप बसेल.

चालकांवर देखरेख

- स्टिअरिंगजवळ कॅमेरा लावल्याने बस चालविताना चालकाला डुलकी लागत आहे का?

- चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्यात कैद होईल.

- चालकाला काही त्रास होतो आहे का? तो रागात आहे का? हेही पाहिले जाईल.

- चालकाला झोप येत असेल, तर अलार्म सिस्टीमद्वारे प्रशासनाला समजेल.

‘पीएमपी’ बसमध्ये ‘एआय’ आधारित कॅमेरे बसवून त्याची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मंजुरी मिळताच कॅमेरे बसविले जातील.

- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे