Action, PMC Tendernama
पुणे

Pune: विनापरवाना रस्ते खोदाई ठेकेदाराला महागात पडणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune): पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) शहरात बीओटीवर २०० बसथांबे उभारण्यासाठी टेंडर (Tender) मंजूर केल्यानंतर ठेकेदाराने महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदाई केली व जाहिरात फलक लावले.

हे प्रकरण ठेकेदाराला चांगलेच महागात पडणार असून टेंडर रद्द करण्यासाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तर ठेकेदारावर विशेष कृपा दाखवणारे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, महापालिका प्रशासन अजूनही का कारवाई करत नाही? असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

पीएमपीने शहरात ‘बीओटी’वर २०० बसथांबे उभारण्यासाठी मे. सिद्धी ॲव्हरटायझिंग कंपनीला काम दिले आहे. बसथांबे उभारताना ते चुकीच्या ठिकाणी उभारले. शिवाय तेथे वीज पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाची परवानगी न घेता पादचारी मार्ग व रस्ते खोदाई केली. प्रत्येक बसथांब्यासाठी किमान ५० मीटर लांबीची खोदाई करून महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे शुल्क बुडविले. बसथांब्यावर जाहिरात करण्यासाठी आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी न घेता त्याचेही शुल्क बुडविले आहे.

नियमबाह्यपणे ठेकेदाराने काम करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने मुख्य वाहतूक व्यवस्थापक झेंडे यांच्यावर कारवाई करावी व निविदा रद्द करावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली होती. त्यानुसार पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली आणि झेंडे यांची बदली करताना त्यांच्या पदाचा दर्जा कमी करून, उप मुख्य व्यवस्थापक म्हणून वाघोली डेपो येथे बदली केली आहे.

सिद्धी ॲडव्हरटायझिंगची निविदा रद्द का करू नये व कंपनीला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीसही बजावण्यात आली आहे, असे संभूस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिकेची परवानगी न घेता खोदाई करणे व जाहिरात फलक लावणे यामुळे ठेकेदाराकडून तीनपट दंड वसूल करणे आवश्‍यक आहे. ही रक्कम दंडासह किमान १५० कोटीपर्यंत जाते. तरीही महापालिकेकडून अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. पीएमपीशी पत्रव्यवहार केला जात असल्याचे कारण देत कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभाग व आकाश चिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी संभूस यांनी केली.