Pune City
Pune City Tendernama
पुणे

पुणे पालिकेचे खटक्यावर बोट! एवढं पेमेंट करा अन् खुशाल फ्लेक्स लावा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरात रस्त्यावर, चौकात अनधिकृत फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करण्याचा प्रकार राजकीय पदाधिकारी, संघटना, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. यातून महापालिकेला उत्पन्न तर मिळत नाही, उलट फ्लेक्स काढण्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड पडतो. मात्र, आता महापालिकेने शहरातील मोजक्या ठिकाणी सशर्त परवानगी देऊन फ्लेक्सबाजी करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चमकोगिरी करणाऱ्यांना प्रतिदिन प्रत्येक चौरस फुटाला ४० रुपये मोजावे लागणार आहेत. पुढील एक ते दीड महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पुणे शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी एकीकडे स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. आता तर ‘जी २०’ परिषदेच्या काळात शहर फ्लेक्समुक्त असावे, यासाठी आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. पण, तरीही चमकोगिरी करणाऱ्यांनी फ्लेक्स लावणे थांबविलेले नाही. फ्लेक्सबाजी करताना १० बाय १० पासून ते ३० बाय ४० पर्यंत असे मोठे फ्लेक्स लावले जात आहेत. जेवढा मोठा फ्लेक्स, तेवढा वजनदार माणूस असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजसेवक, राजकीय नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. गर्दीच्या ठिकाणी, भर चौकात, रस्ता, पादचारी मार्ग अडवून फ्लेक्स लावले जात आहेत.
फ्लेक्स बाजी करणाऱ्यांना वचक बसावा यासाठी प्रति फ्लेक्स एक हजार रुपये दंड करून त्याची वसुली करण्याचा आदेश आकाश चिन्ह निरीक्षक क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. त्यातून काही प्रमाणात कारवाईचा जोर वाढलेला असला तरीही फ्लेक्सबाजी कमी झालेली नाही. आज कारवाई केली तर पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरे नवीन फ्लेक्स चौकांमध्ये आणि रस्त्यांवर लागत आहेत.

किमान १५० ठिकाणी अशी असणार व्यवस्था
१) राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, विविध प्रकारच्या संघटना व व्यावसायिकांना महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांवरच फ्लेक्स लावता येणार.
२) इतर ठिकाणी फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करू नये, यादृष्टीने महापालिकेने पाऊल उचलले आहे.
३) १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रत्येकी किमान १० जागा फ्लेक्ससाठी निश्चित केल्या जाणार आहेत.
४) नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज करून फ्लेक्सच्या आकारानुसार व किती दिवस लावणार यानुसार प्रति चौरस फूट ४० रुपये यानुसार भाडे भरावे लागणार आहे.
५) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत फ्लेक्स कुठे लावायचे, या जागा निश्‍चित करण्याचे काम सुरू.

न्यायालयाचा आदेश
होर्डिंग, फ्लेक्स यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका आहेत. त्यामध्ये नागरिकांची सोय लक्षात घेऊन काही ठिकाणी अधिकृतपणे फ्लेक्स लावण्याच्या जागा निश्चित कराव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महापालिका धोरण तयार करत आहे, असे आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

फ्लेक्स लावण्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही यादी राज्य सरकारकडे माहितीसाठी पाठवली जाणार आहे. किमान एका महिन्यामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकृत फ्लेक्स लावता येतील. यानंतरही जे नागरिक बेकायदा फ्लेक्स इतर ठिकाणी लावतील, त्यांच्यावर दंडात्मक व गुन्हा दाखल करण्याची कारवाई अधिक कडकपणे केली जाईल.
- माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग

फ्लेक्स लावण्यासाठी महापालिका सशुल्क जागा उपलब्ध करून देणार असल्याने त्याचा शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यास उपयोग होईल. पण हे नियम केल्यानंतर इतर ठिकाणी फ्लेक्स लागणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी आवश्‍यक आहे. तसेच यात महापालिका प्रशासनाने पारदर्शकपणे कारभार करून उत्पन्न वाढीस हातभार लावावा.
- अविनाश खंडारे, नागरिक