पुणे (Pune) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी (ता. २५) संपल्याने आता पुणे महापालिकेतील आर्थिक व धोरणात्मक निर्णयांना गती येणार आहे. चालू आर्थिक वर्षातील साडेचार महिने आचारसंहितेत गेले. केवळ चार महिनेच प्रशासनाला कामे करता आली. आता उर्वरित चार महिन्यांत रखडलेली कामे पूर्ण करावी लागणार आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मान्यता दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचा प्रारंभ होणार आहे.
२०२४ मध्ये लोकसभा आणि राज्याची विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तीन महिने होती. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाला कोणतेही काम करता आले नाही. तसेच बरेच कर्मचारी लोकसभेच्या कामासाठी नियुक्त केल्याने काम ठप्प झाले. त्यानंतर जून ते ऑक्टोबरदरम्यान महापालिकेचे कामकाज झाले. त्यात देखभाल-दुरुस्तीच्या कामाच्या निविदा, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, पथ, घनकचरा विभागाच्या शेकडो कोटी रुपयांच्या निविदा मंजूर केल्या. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अखेरच्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ४०० कोटींचे प्रस्ताव मंजूर झाले होते.
विधानसभेची आचारसंहिता दीड महिने होती. या काळातही महापालिकेचे कामकाज ठप्प होते. या काळात ज्या कामांची सुरुवात झालेली नव्हती, त्यांचा प्रारंभ आता होणार आहे. तसेच नदीकाठ सुधार, यांत्रिकीकरणाद्वारे रस्ते सफाई, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे आदी प्रकल्पांच्या निविदा मंजूर होण्याची शक्यता आहे. आता महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारसाठी पोषक वातावरण असल्याने सरकारकडून महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी घाई केली जाऊ शकते. त्यासाठी न्यायालयीन तिढादेखील लवकर सुरू होऊ शकतो, असे राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा अंदाज खरा ठरल्यास निवडणुका एप्रिल-मे महिन्यात पार पाडाव्या लागतील. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला त्याची प्रक्रिया किमान तीन महिने आधी सुरू करावी लागेल. त्यामुळे महापालिका प्रशासनाला विकासकामे करण्यासाठी अपुरा वेळ मिळण्याची शक्यता आहे.
कामाची गती वाढवावी लागेल :
जानेवारीमध्ये पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी प्रशासनाकडून सुरू होते. आचारसंहितेत साडेचार महिने काम ठप्प होते. त्यामुळे प्रशासनाला काम करण्यासाठी कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कामाची गती वाढवावी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.