Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : मुठा नदीचे गटार होण्याचं थांबणार! आता मैलापाणी थेट नेणार...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुठा नदीला येऊन मिळणारे नाले आणि ओढ्यांतील मैलापाणी नदीत सोडण्याऐवजी पाइपलाइनने मुंढव्यापर्यंत नेण्यात येणार आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. नदीमध्ये कोणत्याही मार्गाने मैलापाणी जाऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत जायका कंपनीच्या सहकार्याने ११ मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत मुळा-मुठा नदी काठाचे सुमारे ४४ किलोमीटर लांबीच्या सुशोभीकरणाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. त्यामध्ये बंडगार्डन येथील चार किलोमीटर टप्प्याचे काम झाले असून बंडगार्डन ते मुंढवा दरम्यानच्या कामाने वेग घेतला आहे. दरम्यान, नदीकाठ सुधार योजनेमध्ये झाडे काढण्याला विरोध होत असून प्रशासनाने यावरील हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतली आहे. यासंदर्भातील अहवाल तयार करून मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविणार आहे.

यासंदर्भात शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ‘‘कोथरूड, आंबीलओढा, नागझरी नाला आणि भैरोबा नाल्यातून मैलापाणी थेट नदीपात्रात येते. या नाल्यांच्या कडेला असलेल्या झोपडपट्ट्यांमधील मैलापाणी नाले व ओढ्यांमध्ये येते. हे नाले, ओढ्यांच्या कडेने सांडपाणी वाहिन्या विकसित केल्या आहेत. परंतु, अनेक ठिकाणी काही समाजकंटकांकडून ड्रेनेज व पाइपलाइन फोडण्यात येत असल्याने मैलापाणी नाले-ओढ्यातून वाहते. याचा विचार करून नदी सुधार योजनेमध्ये नाले-ओढ्यातून येणारे मैलापाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या दोन्ही तिरांवरून मुंढव्यापर्यंत १६०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनचे काम नदीकाठ सुधार योजनेमध्ये केले आहे.’’

नक्की काय करणार?

१) नाले व ओढे ज्याठिकाणी नदीला मिळतात, तेथे टॅपिंग करून या पाइपलाइन जोडण्यात येतील. त्यामुळे पावसाळ्यात नाले आणि ओढ्यात येणारे पावसाचे पाणी थेट नदीपात्रात जाईल.

२) मुंढवा येथील जॅकवेलजवळ १०० एमएलडी क्षमतेच्या मैलापाणी प्रक्रिया प्रकल्पाचे नियोजन

३) येथे प्रक्रिया केल्यानंतरच ते पाणी नदीपात्रात सोडणार

४) मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प व नदीकाठ सुधार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात सांडपाणी वाहिनीच्या गळतीचे किरकोळ मैलापाणी वगळता प्रक्रिया केलेलेच पाणी पाहायला मिळेल

५) नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार