
पुणे (Pune) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) पुणे विभागांतर्गत १२४ कनिष्ठ अभियंता आणि १८९ स्थापत्य अभियंता, अशा एकूण ३१३ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागात पदभरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती दिल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे, ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो.
त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे स्थानिक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर परिणाम होत आहे.
पुणे विभागात कनिष्ठ अभियंता पदाची १२४, तर स्थापत्य अभियंत्यांची १८९ पदे रिक्त आहेत. याबाबत राज्य शासनाला कळविले आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २८ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर पुणे विभागाची आढावा बैठक घेतली. त्यामध्येही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ही पदे लवकरच भरण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
- अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग