PMC Pune Tendernama
पुणे

Pune : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांतील रस्त्यांची आखणी केली जाणार

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील रस्त्यांच्या जागा निश्‍चित झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रादेशिक आराखड्यानुसार (आरपी) रस्त्यांची आखणी केली जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास आज (ता. १३) स्थायी समितीने मान्यता दिली. या कामासाठी ४१ लाखाचा खर्च येणार आहे.

राज्य सरकारने २०१७ मध्ये ११ गावांचा तर २०२१ मध्ये २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश केला. त्यातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे नुकतीच वगळण्यात आली आहे. सध्या महापालिकेत ३२ गावे आहेत. या दोन्ही गावांचा विकास आराखडाही अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे या गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची केवळ दुरुस्ती करणे, खड्डे बुजविणे अशी कामे महापालिका करत आहे.

सरकारच्या प्रादेशिक आराखड्यातील प्रस्तावित रस्ते, अस्तित्वातील रस्ते, प्रस्तावित असलेले रुंदीकरण याची नेमकी माहिती महापालिकेकडे नाही. त्यामुळे नव्याने रस्तेही करता येत नाहीत. त्यामुळे या रस्त्याची प्रादेशिक आराखड्यानुसार आखणी केली जाणार आहे. यामुळे समाविष्ट गावातील रस्त्याची सद्यःस्थिती प्रशासनाच्या लक्षात येणार आहे. रस्त्यांच्या आखणीमुळे ग्रामस्थांनाही रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही हे कळेल, जागेची खरेदी विक्रीही, वाटणी यासह कामे करताना रस्त्याबाबत स्पष्टता येणार आहे.