पुणे (Pune) : गेल्या अनेक वर्षांपासून मुळा-मुठा नदी आणि नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण, अरुंद पात्र याकडे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने लक्ष दिले नाही, त्यामुळे मुठा नदीला जुलैमध्ये पूर आला, असा ठपका महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने ठेवला आहे. आयुक्तांना अहवाल सादर होऊन दोन महिने झाले, त्यावर अद्याप बैठक झालेली नव्हती. आता आयुक्तांनी बैठक घेऊन कारवाईचा आदेश दिला आहे.
शहरात जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर सिंहगड रस्ता परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. मध्यरात्री पाणी शिरल्याने एकतानगरी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. पूर कशामुळे आला? याचा अभ्यास करण्यासाठी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी चार सदस्यांची समिती नेमली होती. त्याचा अहवाल सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आला. परंतु, आयुक्तांनी अहवाल सार्वजनिक न केल्याने सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आक्षेप घेतला होता. आचारसंहिता संपल्यानंतर अहवाल बुधवारी (ता. २७) जाहीर केला. याबाबत आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, ‘‘मुठा नदीला आलेल्या पुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल जाहीर केला आहे. पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य कारवाई व उपाययोजना केल्या जातील.’’
अतिरिक्त आयुक्तांकडे जबाबदारी :
भिडे पुलालगत मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व अतिक्रमण झाले आहे. अवैध बांधकाम पाडण्यासाठी २४ तासांची मुदत दिलेली असली, तरी बांधकाम विभागाने अद्याप पूर्ण बांधकाम पाडलेले नाही. हे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर त्यांनी अतिक्रमण काढण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना दिली आहे.
अवैध बांधकामांचा स्पष्ट उल्लेख नाही :
महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी करून मुठा नदीतील अतिक्रमण, अवैध बांधकाम, राडारोडा टाकल्याच्या ठिकाणांची पाहणी केली आहे. मात्र, आयुक्तांना अहवाल सादर करताना संबंधित ठिकाणांची पूर्णपणे माहिती दिलेली नाही. केवळ मोघम उल्लेख केलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कारवाई करताना कोणत्या ठिकाणी करायची? यावरून गोंधळ निर्माण होणार आहे. नदीकाठच्या जागा मालकांची किंवा अवैध बांधकामांची नावासह माहिती दिली असती, तर प्रशासनाला कठोर कारवाई करणे भाग पडले असते.
पुराची कारणे
१. मुठा नदीत ४० हजार क्यूसेक जरी पाणी सोडले; तरी अवैध बांधकामे, राडारोडामुळे पूर येतो
२. नदीपात्रात व किनाऱ्यावर टाकला जाणारा कचरा
३. विविध अडथळ्यांमुळे नदीच्या वहन क्षमतेत घट
अशा आहेत उपाययोजना
१. निळ्यापूररेषेच्या आत असलेल्या बांधकामांवर निळी पूररेषा, लाल पूररेषा दर्शवावी
२. जेथे नदीचे अस्तित्व राहिले नाही, तेथील बांधकामे पाडून नदी अस्तित्वात आणावी
३. निळ्या पूररेषेप्रमाणे नदीचा प्रवाह अडथळामुक्त असावा
४. मुठा नदीतून एक लाख क्यूसेक पाणी वाहून जाण्याची क्षमता असावी
५. नाल्यांतील अडथळे काढावेत
६. २० हजार, ३० हजार आणि ४० हजार क्यूसेक पाणी कुठल्या भागात येते, ते चिन्हांकित करावे
७. प्रवाहाला अडथळे ठरणारे बंधारे, पूल काढून टाकावेत
८. अतिक्रमण, अवैध बांधकाम करणारे, राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत