Pune PMC Tendernama
पुणे

Pune : महापालिका प्रशासनाकडून वैकुंठ स्मशानभूमीच्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वैकुंठ स्मशानभूमीत श्‍वानांनी मृतदेहाचा काही भाग पळविल्याचा प्रकार घडला नसल्याचा दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र स्मशानभूमीतील कामाची जबाबदारी असणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने शुक्रवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच स्मशानभूमीत नियमित स्वच्छता, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी यांसारखी कामे तातडीने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे मृतदेहाचा काही भाग श्‍वानांनी पळविल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीची पाहणी केली. या घटनेमध्ये मृतदेहाचा भाग श्‍वानांनी पळवून नेला नसल्याचा दावा पृथ्वीराज बी. पी. यांनी केला.

दरम्यान, स्मशानभूमीतील स्वच्छता, अंत्यविधी, देखभाल-दुरुस्ती अशा कामासाठी नेमलेल्या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले. याबरोबरच स्मशानभूमी व परिसरात तातडीने स्वच्छता करावी, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात याव्या, तसेच स्मशानभूमीत मोकाट श्‍वानांना खाद्यपदार्थ देण्यात येऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, आरोग्य विभागाकडून श्‍वानांना पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे, यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.