MHADA Pune
MHADA Pune Tendernama
पुणे

Pune : अवघ्या 6 वर्षांत अशी झाली 34 हजार पुणेकरांची स्वप्नपूर्ती

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada) पुणे मंडळाकडून गेल्या सहा वर्षांत ३४ हजार ४९३ नागरिकांचे घरांचे (Flats) स्वप्न पूर्ण केले असल्याचे समोर आले आहे. गेल्या सात वर्षांत सर्वाधिक घरांसाठी सोडत (Mhada Lottery) पुणे मंडळातच काढण्यात आल्या आहेत.

म्हाडाकडून बाजारभावापेक्षा कमी दरात अत्यल्प, अल्प आणि मध्यम या गटांमधील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढली जाते. तसेच सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजनांमधूनही घरे उपलब्ध करून दिली जातात. या पद्धतीने २०१६ पासून आतापर्यंत म्हाडा पुणे मंडळाने ३४ हजार ४९३ घरांचे वितरण केले आहे. त्यासाठी चार लाख ५३ हजार ४७२ जणांनी अर्ज केले होते.

याबाबत बोलताना म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘‘गेल्या सात वर्षांत वितरण केलेल्या सदनिकांपैकी २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत येणाऱ्या ११ हजार सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले आहे. अल्पदरानुसार (ॲन्युअल शेड्यूल रेट- ASR) केवळ बांधकाम खर्चामध्ये घरे मिळतात. त्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. २०२०-२१ या कोरोना काळातदेखील म्हाडा पुणे मंडळाकडून १५ हजार ४७७ सदनिकांचे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले.’’

असे झाले घरांची वितरण
(वर्ष - सदनिका)
- २०१६ - २ हजार ५७०
- २०१८ - ३ हजार ९८०
- २०१९ - ७ हजार २४४
- २०२१ - ८ हजार ५५५
- २०२२ - १२ हजार २४५

नव्या वर्षात ५ हजार ९१५ घरे उपलब्ध
नव्या वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ५ हजार ९१५ घरांची सोडत म्हाडा पुणे मंडळाकडून काढण्यात आली आहे. त्यात म्हाडाच्या विविध योजनांतील २ हजार ५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २ हजार ९९० सदनिका, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.