पुणे (Pune) : डेक्कन, जंगली महाराज रस्त्यावर पार्किंगची सुविधा करण्यासाठी पुणे महापालिकेने (PMC) अनेक वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानासमोर मेकॅनिकल वाहनतळ उभे केले. पण ते वाहनतळ यशस्वीपणे चालविता आले नाही. आता हे वाहनतळ महामेट्रोला चालविण्यासाठी देणार आहे. खर्च जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिकेला ८० टक्के रक्कम मिळणार आहे.
महामेट्रोने वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या मार्गांवर मेट्रोसेवा सुरू केली आहे. पण मेट्रो स्टेशनच्या परिसरात पुरेशी पार्किंग सुविधा नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. मेट्रोने प्रवास करण्यापूर्वी दुचाकी, चारचाकी लावायची कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने महामेट्रोला काही जागा हस्तांतर केली आहे. पण तेथे पार्किंगची सुविधा सुरू झालेली नाही.
मेट्रोचे संभाजी उद्यान येथील स्टेशन सुरू झाले आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावरील मेकॅनिकल वाहनतळ मेट्रोच्या उपयोगी ठरणार आहे. याचा प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित होता. यासंदर्भात एक बैठक झाली असून, त्यात हे वाहनतळ मेट्रोला देण्याचा निर्णय झाला आहे.
पार्किंग आठ वर्षांपासून बंद
महापालिकेने अडीच कोटी रुपये खर्च करून संभाजी उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ मेकॅनिकल वाहनतळ उभे केले. हे वाहनतळ आठ वर्षांपासून देखभाल-दुरुस्तीअभावी पडून आहे. पालिकेने हे वाहनतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान हे वाहनतळ एका ठेकेदाराला चालविण्यास दिल्यानंतर त्याने नागरिकांच्या गाड्या लावण्याऐवजी एका राजकीय व्यक्तीच्या शो रूमच्या गाड्या ठेवण्यासाठी त्याचा वापर सुरू केला. त्यानंतर त्याचा ठेका रद्द करण्यात आला. तेव्हापासून हे वाहनतळ बंदच आहे.
पालिकेला ८० टक्के उत्पन्न
मेकॅनिकल वाहनतळ महामेट्रोच्या ताब्यात देण्यास महापालिकेच्या भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समितीत मान्यता देण्यात आली. या वाहनतळातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्यातील ८० टक्के पालिकेला तर २० टक्के उत्पन्न महामेट्रोस दिले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठविला आहे, असे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
दुरुस्तीसाठी खर्च
अनेक वर्षांपासून हे वाहनतळ बंद पडलेले आहे. त्यामुळे येथील यंत्रसामुग्रीची देखभाल व दुरुस्ती नियमीत झालेली नाही. या वाहनतळाच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येण्याची शक्यता आहे. हा खर्च पुणे महापालिका करणार की महामेट्रो, हे अद्याप निश्चित झालेले नाही.