Pune Metro Tendernama
पुणे

Pune Metro : नव्या वर्षांत पुणेकरांची मेट्रोला पसंती! पिंपरी ते स्वारगेट मार्गावर...

Swargate To Pimpri Metro : प्रवासाला मेट्रो सोयीची आणि सुखकर होत असल्‍याने अनेक जण त्‍याला पसंती देत आहेत. त्‍यामुळे दरदिवशी मेट्रोच्‍या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे.

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : नववर्षाच्‍या सुरुवातीच्‍या सात दिवसांत पुणे मेट्रोच्या (Pune Metro) प्रवाशांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्‍यामधून या सात दिवसांत ८५ लाखांवर मेट्रोचे उत्‍पन्न झाले आहे. स्‍वारगेटपर्यंत मेट्रो झाल्‍याने नागरिकांना प्रवास करणे सोपे झाले आहे.

अनेकजण नववर्षाची सुरूवात देवदर्शनाने करतात. पुणे शहरात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनीही बुधवारी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखोंचा जनसमुदाय पुण्यात आला होता. प्रवासाला मेट्रो सोयीची आणि सुखकर होत असल्‍याने अनेक जण त्‍याला पसंती देत आहेत. त्‍यामुळे दरदिवशी मेट्रोच्‍या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे.

स्‍वारगेटपर्यंत मेट्रोची व्‍यवस्‍था झाल्‍याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुण्यात कमी वेळेत जाताना अधिक सोयीचे होत आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर वर्षाच्या पहिल्याच आठवड्यातील सात दिवसांत पाच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर या मार्गिकेवर ८४ लाख ९० हजार ४३४ प्रवाशांनी प्रवास केला असल्‍याची नोंद आहे.

पहिल्‍याच दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिक संख्या आहे. एक जानेवारीला तब्‍बल एक लाख दोन हजार ७८३ प्रवाशांची नोंद असून, त्‍या माध्यमातून १९ लाख ३४ हजार ९०४ रुपयांचे उत्‍पन्न प्राप्‍त झाले आहे.

पिंपरी ते स्वारगेट प्रवासी संख्या आणि उत्‍पन्न

तारीख ः प्रवासी संख्या ः उत्‍पन्न

१ जानेवारी ः १,०२, ७८३ ः १९,३४, ९०४

२ जानेवारी ः ६६, ०७१ ः ११, ७६, ४३९

३ जानेवारी ः ६२, ३५५ ः ११,००,६१७

४ जानेवारी ः ७०, ३१९ ः ९, ५९, ५९५

५ जानेवारी ः ७७, ३०४ ः १०, ८९, ४६५

६ जानेवारी ः ६२, २४५ ः ११, २९, १८३

७ जानेवारी ः ६३, ३६६ ः ११, ००, २३१

एकूण ः ५, ०४, ४४३ ः ८४, ९०, ४३४

नवीन वर्षानिमित्त कुटुंबाला घेऊन पुण्यात फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. त्‍यानुसार सकाळीच आम्‍ही मेट्रोने गेलो. स्‍वारगेटपर्यंत व्‍यवस्‍था असल्‍याने पूर्वीसारखी गैरसोय होत नाही. तसेच कुटुंबाला देखील आरामदायी प्रवास करता येत आहे.

- संतोष खुंटे, प्रवासी