पुणे (Pune): पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Purandar Purandar International Airport) भूसंपादनासाठीचे संमतिपत्र देण्याच्या संख्येत वाढ होत आहे.
मागील १५ दिवसांत सात गावांमधील १ हजार ६०० शेतकऱ्यांनी १ हजार ७५० एकर क्षेत्रासाठी संमतिपत्र जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. त्यामुळे साठ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमती दिली असून सात गावांपैकी मुंजवडी गावातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी संमतिपत्र सादर केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच दिली.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ हेक्टर इतके होते. आता त्यात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून १ हजार २८५ हेक्टर केले आहे.
भूसंपादनासाठी २५ आॉगस्टपासून संमतिपत्र स्वीकारण्यास सुरवात झाली. मुंजवडी गावातील सुमारे ७६ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून आतापर्यंत ७० हेक्टर क्षेत्राचे संमतिपत्र शेतकऱ्यांनी सादर केले आहे. त्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे.
विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ७५० एकर क्षेत्र ताब्यात घेण्यास प्रशासनाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्राच्या ६२ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी संमतिपत्र सादर केले आहे.