Pune Metro Tendernama
पुणे

Pune : महामेट्रोच्या दिरंगाईमुळे कोथरूडकरांच्या डोक्याला ताप

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कोथरूड पोलिस ठाणे ते परांजपे शाळा यादरम्यान असलेल्या डीपी रस्त्यावर जवळपास दहा ठिकाणी उच्च विद्युत वाहिनीच्या कामासाठी खोदाई केली असून येथील काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने कोथरूडकरांना दोन ते अडीच महिन्यांपासून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच पदपथ खोदल्याने पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना केली आहे.

महामेट्रोच्या वतीने पर्वती ते वनाज या मार्गावर १३२ केव्ही उच्च विद्युत वाहिनी बसविण्याचे काम जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी सातत्याने रस्त्याची खोदाई केली जाते. विविध दुकानदार, व्यावसायिकांच्या दारासमोर मोठे खड्डे खोदल्याने त्यांचे व्यवसाय देखील डबघाईला येऊ लागले आहेत.

परांजपे शाळा, महेश विद्यालय व इतर शाळांमध्ये जाण्या-येण्यासाठी दररोज शेकडो शाळेच्या बसला डीपी रस्त्याचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर पालक, नोकरदार, कामगार, व्यावसायिक देखील याच मार्गाने ये-जा करतात. प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.

कामाच्या दिरंगाईबद्दल महामेट्रोच्या वतीने विविध कारणे दिली जातात. मात्र, नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे महापालिका प्रशासन किंवा महामेट्रोकडून दुर्लक्ष केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

एक केबल टाकण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो. सात ते आठ दिवसांत काम पूर्ण होईल. काही नागरिकांनी काम थांबवले होते. मात्र, नागरिकांना विश्वासात घेऊन काम पुन्हा सुरू केले. १३२ केव्ही केबल जोडणारे पुण्यामध्ये केवळ दोनच तंत्रज्ञ असल्याने विलंब लागला, सध्या दिल्ली येथून तंत्रज्ञ बोलावून केबल जोडण्याचे काम सुरू आहे.

- बाबूराव सिंगनाथ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मेट्रो

महामेट्रोने लवकरात लवकर काम केले पाहिजे, कामाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरू नये. मेट्रोकडे विद्युत वाहिनी जोडण्यासाठी तंत्रज्ञ नाहीत हे कारण पटण्यासारखे नाही. महापालिकेची परवानगी मिळण्याच्या अगोदरच रस्ते खोदून ठेवले जातात. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून लवकर काम मार्गी लावावे.

- नीलेश कोंढाळकर, स्थानिक नागरिक