Mumbai Pune Road
Mumbai Pune Road Tendernama
पुणे

Pune : मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणचा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले मेट्रोचे काम आणि बोपोडी ते वाकडेवाडीपर्यंत रखडलेले पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यांत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता असून, लवकरच महामार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे सध्याचा खडकी बाजारमार्गे पुण्यात जाण्याचा वळसा वाचणार असून, पिंपरी-चिंचवडमधील निगडी ते पुण्यातील वाकडेवाडीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे.

निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून दापोडीतील मुळा नदीवरील हॅरिस पुलापर्यंत मुंबई-पुणे महामार्गाचा समावेश पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. हॅरिस पुलापासून अर्थात बोपोडीपासून वाकडेवाडी-शिवाजीनगरपर्यंतचा (पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय) भाग पुणे महापालिका हद्दीत आहे.

खडकी रेल्वे स्थानक परिसरात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द आहे. निगडीपासून हॅरिस पुलापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामार्ग आठपदरी रुंद केला आहे. त्यावर दोन्ही बाजूस पदपथ, सेवा रस्ते, बीआरटीएस मार्ग आहे. मुख्य मार्ग केवळ नाशिक फाटा चौक आणि फुगेवाडी या दोनच ठिकाणी खंडित झाला आहे. ही ठिकाणे वगळता निगडीपासून ते बोपोडीपर्यंत सुमारे साडेबारा किलोमीटरचा प्रवास विनाथांबा करता येतो.

मुळा नदीवर हॅरिस पुलाला समांतर दोन नवीन पूल उभारल्यामुळे पुलावर होणाऱ्या कोंडीचा प्रश्नही सुटला आहे. मात्र, बोपोडी चौकापासून वाकडेवाडीपर्यंत दुपदरी रस्ता होता. त्यामुळे वाहनांची गती मंदावून कोंडीत भर पडत होती. गेल्या चार वर्षांपासून पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गाची उभारणी व पुणे महापालिका हद्दीत महामार्ग रुंदीकरणाच्या कामांमुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. बोपोडी चौकातून खडकी बाजार मार्गे पुण्यात जावे लागत आहे. वाकडेवाडीकडून पिंपरीकडे जाणारी वाहतूक महामार्गाने सुरू आहे.

खडकी बाजार परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. शिवाय, अंतरही जास्त असल्याने इंधन व वेळही अधिक लागत आहे. त्याचा वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता मेट्रो मार्ग उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. खडकी मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. महामार्गाच्या रुंदीकरणास अडथळा ठरणारी बांधकामे हटविली आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होऊन महामार्गाने पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू होईल.

अशी आहे रस्त्याची लांबी (किलोमीटरमध्ये)

निगडी ते बोपोडी ः १२.५

बोपोडी ते रेंजहिल्स चौक ः २.७

बोपोडी ते वाकडेवाडी ः ४.७

निगडी ते वाकडेवाडी ः १७.२

मी खासगी कंपनीत नोकरीला आहे. पुणे कॅम्पात आमचे कार्यालय आहे. मोटारसायकलने दररोज ये-जा करतो. बोपोडी चौकातून खडकी बाजार, मुळा रस्ता मार्गे वाकडेवाडीत निघावे लागते. या रस्त्यावर नेहमीच कोंडी होते. त्यामुळे वेळ अधिक लागतो. अनेकदा अर्धा-अर्धा तास अडकून पडावे लागते. बोपोडी चौकातून थेट वाकडेवाडी जाण्यासाठीचा मार्ग सुरू करायला हवा.

- अजय दिवेकर, नोकरदार, चिंचवड

मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासाठी बोपोडी ते रेंजहिल्स चौकापर्यंत दोन्ही बाजूची जागा ताब्यात आली आहे. दोन्ही बाजू मिळून महामार्ग ४२ मीटर रुंद होईल. खडकी मेट्रो स्थानकाचे काम सुरू असल्यामुळे बोपोडी चौकापासून ऑल सेंट स्कूल चौकापर्यंतचा रस्ता जड वाहतुकीसाठी तूर्त सुरू करता येणार नाही. मात्र, हलक्या वाहनांसाठी दुहेरी मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.

- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका