MHADA Pune
MHADA Pune Tendernama
पुणे

Pune: म्हाडा लॉटरीबाबत संभ्रम; विजेत्यांची नावे वेबसाईटवरून गायब?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (MHADA) पुणे जिल्ह्यातील सहा हजार ६९ सदनिकांच्या सोडतीचा (MHADA Lottery Result) निकाल जाहीर झाला खरा, परंतु संगणक प्रणालीतील बिघाडामुळे विजेत्यांची यादीच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली नाही. परिणामी, अर्जदारांना आपली निवड झाली आहे की नाही, आपले नाव प्रतिक्षा यादीत आहे किंवा नाही याची माहिती होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

‘म्हाडा’मार्फत काढण्यात येणाऱ्या सदनिकांच्या सोडतीमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ नये, यासाठी ‘इंटिग्रेडेट लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयएलएमएस) २.० ही नवीन प्रणाली वापरण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुणे मंडळांतर्गत जानेवारी महिन्यात सहा हजार ६८ सदनिकांची सोडत जाहीर केली होती.

मात्र, अर्ज भरताना असणाऱ्या जाचक अटी, कागदपत्रांची पूर्तता, त्यानंतर प्रमाणिकरणासाठी लागणारा वेळ, रहिवासी प्रमाणपत्राबाबत आलेल्या मुख्य अडचणींबाबत वारंवार नागरिकांनी तक्रारी करूनही त्यात कोणताही बदल केला नाही. परिणामी, सोडतीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अशा अनेक अडथळ्यांनंतरही २० मार्च रोजी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आले. मात्र, अद्यापही विजेत्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली नाही.

तर काही विजेत्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून प्रणालीतील अडचणींमुळे सदनिका रद्द झाल्या आहे, असे कळविण्यात आले. यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवेळी निकाल जाहीर झाल्यानंतर सायंकाळपर्यंत विजेत्यांची यादी आणि प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. परंतु, नवीन प्रणालीद्वारे निकाल जाहीर करून आठवडा झाला तरी अद्याप कुठलीच यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली नाही.

अडचणी काय?
- विजेत्याने ऑनलाइन सदनिका स्वीकारण्याचा प्रयत्न करताच आपोआप रद्द होणे
- कागदपत्रे संगणकीकृत केले असतानाही अद्याप काही पडताळणीसाठी प्रलंबित
- आरक्षण श्रेणीतील अर्जदार प्रमाणपत्र सादर करू शकत नसल्याने, सहमतीसाठी पुन्हा म्हाडाच्या कार्यालयात जाऊन प्रक्रिया करावी लागणार
- विजेत्यांव्यतिरिक्त इतरांनी भरलेल्या अर्जाचे पैसे अद्याप बँकेत वर्ग झालेले नाही

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या वर्गात अर्ज भरला होता. विजेता झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर प्रयत्न केल्यानंतर कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विजेता आहे किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
- जितेंद्र चव्हाण (नाव बदलले आहे)

सोडतीमध्ये माझा नंबर लागला आहे. परंतु, संकेतस्थळावर गेले असताना माझे नाव प्रतीक्षा यादीमध्ये दिसत आहे. याबाबत म्हाडाकडे तक्रार अर्ज केला आहे. सोडतीमध्ये नंबर लागल्याने मला सदनिका मिळाली पाहिजे.
- सुलभा काळे (नाव बदलले आहे)

आयएलएमएस प्रणालीत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ते दूर करण्याचे काम सुरू आहे.
- म्हाडा