पुणे (Pune): बांधकाम क्षेत्राला गत वर्षीच्या तुलनेत यंदा चांगले दिवस आले आहेत. मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दस्त नोंदणीमध्ये यंदाच्या तिमाहीत तब्बल पन्नास हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल तब्बल २०० कोटींनी वाढला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गत वर्षी पहिल्या तिमाहीत १० लाख ८४ हजार दस्त नोंदविले गेले होते. यंदा ही संख्या ११ लाख ३३ हजार इतकी आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमधील करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते.
रेडी रेकनरच्या माध्यमातून शासन दरवर्षी स्थावर मालमत्तेचे दर जाहीर करत असते. ती किंमत कर आकारणीची किमान आधारभूत रक्कम मानली जाते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसुल मिळाला आहे. राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरांत मोठ्या प्रमाणावर दुकाने, सदनिकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.
यासह शहरालगतच्या गावांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. यामुळे दस्त नोंदणीत वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदणी विभागाने नोंदविले आहे. राज्य सरकारकडून चालू आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या राज्यात सरासरी ३.८९ टक्के, पुणे शहरात सरासरी ४.१६ टक्के तर पिंपरी -चिंचवड शहरात सरासरी ६.६९ टक्के वाढ करण्यात आली.
रेडी रेकनर दरामध्ये वाढ करण्यात आल्याने महसुलात सुद्धा वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांत दस्तनोंदणीतून राज्य सरकारला १२ हजार ७८३ कोटींचा महसूल मिळाला होता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत १२ हजार ५०२ कोटींचा महसूल जमा झाला होता.
राज्यातील आकडेवारी...
महिना ः नोंदणी झालेले दस्त ः महसूल
एप्रिल ः ३ लाख ७० हजार ८५० ः ३ हजार ७४७ कोटी
मे ः ३ लाख ८२ हजार ४९६ ः ४ हजार ७३६ कोटी
जून ः ३ लाख ७९ हजार ९९५ ः ४ हजार ३०० कोटी