Police Tendernama
पुणे

Pune : 'त्या' ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल; कारण काय?

Scam : इतका खर्च करूनही त्या ठेकेदाराने (Contractor) तुंबलेली ‘ड्रेनेज पाइपलाइन’ काही दुरुस्त केली नाही.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बंगल्याच्या आवारातील तुंबलेल्या नाल्यामधील कचरा काढण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल तीन लाख ९२ हजार रुपये मोजावे लागले.

इतका खर्च करूनही त्या ठेकेदाराने (Contractor) तुंबलेली ‘ड्रेनेज पाइपलाइन’ काही दुरुस्त केली नाही. त्यामुळे हताश झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला अखेर पोलिस ठाणे गाठावे लागले.

याबाबत जंगली महाराज रस्ता परिसरातील एका ७४ वर्षीय व्यक्तीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी एका ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जंगली महाराज रस्ता परिसरात राहतात. डिसेंबरमध्ये त्यांच्या बंगल्याच्या आवारातील ‘ड्रेनेज पाइपलाइन’ कचरा अडकल्याने तुंबली होती. त्यामुळे त्यांनी ‘ड्रेनेज’च्या दुरुस्तीची कामे करणाऱ्या पौड रस्ता परिसरातील एका ठेकेदाराशी संपर्क साधला.

ठेकेदाराने ‘ड्रेनेज’च्या दुरुस्तीसाठी महापालिकेत शुल्क भरावे लागेल. तसेच, साहित्य खरेदी, कामगारांचा खर्च आणि पाइप उचलण्यासाठी क्रेन लागेल, अशी कारणे सांगून ठेकेदाराने ज्येष्ठ व्यक्तीकडून ऑनलाइन पद्धतीने तीन लाख ९२ हजार घेतले. मात्र, त्याने ‘ड्रेनेज पाइपलाइन’ दुरुस्तीचे काम केले नाही.

त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तीने २९ जानेवारीला डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अश्विनी पवार करीत आहेत.