पुणे (Pune) : पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रांची स्थिती कशी आहे? हे समजून घेण्यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) सुरू केलेल्या सर्वेक्षणाच्या दुसऱ्याच महिन्यात उद्योग वृद्धीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांची टक्केवारी वाढली आहे. पुढील महिनाभरात कंपनीच्या उलाढालीत घट होऊ शकते, अशी शक्यता वर्तविणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी झाली आहे.
गेल्या महिन्यातील सर्वेक्षणाच्या तुलनेत उद्योग वाढीबाबत सकारात्मक असलेल्या कंपन्यांची संख्या ८१ वरून ८४ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर घट होऊ शकते, असे नमूद करणाऱ्या कंपन्यांची संख्या नऊवरून पाच टक्क्यांवर आली आहे.
‘एमसीसीआयए’कडून १०८ कंपन्यांचे जानेवारीतील मासिक सर्वेक्षण करून त्यांच्या वाढीच्या अपेक्षांबाबतचा अहवाल बुधवारी (ता. ८) जाहीर करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाबाबतचा अंदाज कंपन्यांनी या अहवालात वर्तविला आहे. त्यानुसार, पुण्यातील ८४ टक्के कंपन्यांनी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
याचवेळी ११ टक्के कंपन्यांना ‘जैसे थे’ स्थिती अपेक्षित असून, पाच टक्के कंपन्यांनी घट होण्याची शक्यता नोंदविली आहे. ‘एमसीसीआयए’च्या दोन महिन्यांतील मासिक सर्वेक्षणानुसार संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्या आघाडीवर असून, त्या वाढीबाबत सकारात्मक आहेत.
गेल्या महिन्यातील सर्वेक्षणात ३७ टक्के कंपन्यांनी महसुलात २० टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांची संख्या या महिन्यात कमी होऊन २८ टक्क्यांवर आली आहे. याच वेळी १० ते २० टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्यांच्या संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत २६ वरून वाढून ३२ टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच, एक ते १० टक्के वाढ अपेक्षित असलेल्या कंपन्यांची संख्याही गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढून १९ वरून २४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
कंपन्यांनी वर्तवलेला अंदाज (टक्केवारीत)
वाढीचा अंदाज - डिसेंबरमधील प्रतिसाद - जानेवारीमधील प्रतिसाद
१ ते १० - १९ - २४
१० ते २० - २६ - ३२
२० हून अधिक - ३७ - २८
वाढ होणार नाही - ९ - ११
घट होर्इल - ९ - ५
सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांचा प्रकार व संख्या ः
सुक्ष्म - ६१
लघू - ३२
मध्यम - १०
मोठी - ५
एकूण - १०८
पुणे परिसरातील उद्योगांच्या वाढीच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘एमसीसीआयए’कडून मासिक सर्वेक्षण केले जात असून, डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या पहिल्या मासिक सर्वेक्षणात ८१ टक्के उद्योगांनी वाढीची अपेक्षा वर्तविली होती. आता दुसऱ्या मासिक सर्वेक्षणात ८४ टक्के उद्योगांनी सकारात्मकता वाढीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन व संरक्षण क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर असून, सरकारची पूरक धोरणेही या क्षेत्रातील उद्योग वाढीला चालना देत आहेत.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, ‘एमसीसीआयए’