पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या नव्या ‘टर्मिनल’वर (New Terminal At Pune International Airport) मंगळवारपासून (ता. २४) ‘इमिग्रेशन’ची सुविधा सुरू होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे पुण्याहून आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणेही सुरू होतील. यासाठी प्रवासी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत होते. (Murlidhar Mohol Pune News)
नव्या ‘टर्मिनल’वर प्रस्थान विभागात १०, तर आगमन विभागात आठ काऊंटर तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे ‘इमिग्रेशन’च्या वेळी प्रवाशांच्या फार मोठ्या रांगा लागणार नाहीत. काउंटर जास्त असावेत अशा मागणीमुळे गृह मंत्रालयाने परवानगी दिली नव्हती. त्यावरुन भारतीय विमानतळ प्राधिकरण व ‘इमिग्रेशन’ विभाग यांच्यात थोडा वादही झाला. अखेर परवानगी मिळाल्याने प्रवाशांना आता जुन्या ‘टर्मिनल’वरुन जावे लागणार नाही.
सध्या पाच आंतररराष्ट्रीय उड्डाणे
पुणे विमानतळावरून सध्या पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु आहेत. यात पुणे-बँकॉक आणि पुणे-दुबई अशी प्रत्येकी दोन तर पुणे-सिंगापूरचे एक विमान आहे. नव्या ‘टर्मिनल’वर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे. मंगळवारपासून त्याचाही वापर सुरु होईल.
सीमाशुल्कचीही सुविधा
नव्या ‘टर्मिनल’वरुन आता सीमाशुल्क विभागाचीही सेवा सुरु होत आहे. ‘इमिग्रेशन’च्या परवानगीअभावी या विभागाचे काम थांबले होते.
मोहोळ यांच्याकडून आढावा
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी दुपारी पुणे विमानतळाच्या नव्या ‘टर्मिनल’ला भेट दिली. या वेळी त्यांनी तेथे उपलब्ध असलेल्या प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी ‘इमिग्रेशन डेस्क’चीही पाहणी केली.
नव्या ‘टर्मिनल’वर ‘इमिग्रेशन’ला परवानगी मिळाल्याने आता आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे तेथूनच सुरु होतील. त्यामुळे प्रवाशांना अद्ययावत सुविधांचा लाभ घेता येईल. पुणे विमानतळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री