Pune Airport
Pune Airport Tendernama
पुणे

पुणे एअरपोर्टवरील कोंडी कायम; मल्टिलेव्हल पार्किंग काय कामाचे?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) प्रवाशांना सोडायला अथवा घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी विमानतळ प्रशासनाने १२० कोटी रुपये खर्चून मल्टिलेव्हल कार पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनेक प्रवासी, तसेच प्रवासी सुविधा देणाऱ्या कॅब रस्त्याच्या बाजूलाच लावलेल्या असतात. त्यामुळे विमानतळ परिसरात रात्री आठ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या काळात विमानतळावर प्रवेश मिळविणे व बाहेर पडणे प्रवाशांच्या दृष्टीने त्रासदायक ठरते आहे.

पुणे विमानतळावरून रात्रीच्या वेळी विमानाची सर्वाधिक उड्डाणे आहेत. त्यामुळे रात्री विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची गर्दी जास्त असते. रात्रीच्या वेळी सुमारे दोनशेहून अधिक चारचाकी विमानतळाच्या परिसरात थांबलेल्या असतात. त्यामुळे कार पार्किंगसाठी नवीन मॉल बांधूनदेखील प्रवासी त्याकडे दुर्लक्षित करीत आहेत. मल्टिलेव्हल कार पार्किंगच्या एरो मॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या रोज चारशे दुचाकी तर शंभर चारचाकी कार पार्किंगमध्ये लावण्यात येतात. अनेक वाहनचालक रस्त्यावरच कार लावत असल्याने चारचाकीला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. त्याचा फटका मात्र सर्वांनाच बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे बरेचदा प्रवाशांना विमानाची वेळ गाठता येत नाही; परिणामी, अनेक प्रवाशांची फ्लाइट अनेकदा चुकली आहे.

मल्टिलेव्हल कार पार्किंगच्या एरो मॉलमध्ये विमानतळावर प्रवासी सेवा देणाऱ्या कॅब व रिक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मॉलचा चौथा मजला त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तिथे जवळपास २५० हून अधिक चारचाकी थांबतील इतकी जागा आहे. मात्र अनेक कॅबचालक त्याचा फायदा घेत नाहीत. ते रस्त्यावरच वाहन थांबवीत असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. कोंडी होऊ नये यासाठी विमानतळ प्रशासनाचे १५ कर्मचारी व वाहतूक पोलिस प्रयत्न करतात. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात.

प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र अनेक जण रस्त्यावरच वाहने लावतात. यात काही जण प्रवाशांची वाट पाहत थांबतात. अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. वाहनधारकांनी आपली वाहने पार्किंगच्या जागीच लावावीत.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

काही वाहने रस्त्यावरच थांबतात हे खरे आहे. लवकरच त्याठिकाणी सेवा देणाऱ्या कॅबचालकांना मॉलमध्ये शिफ्ट करणार आहोत. या संदर्भात आमचे बोलणे सुरू झाले आहे.
- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पुणे