पुणे (Pune) : पुणे महापालिकेतर्फे (PMC) सुरू असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून ५१ पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. त्या ठिकाणी कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, अतिक्रमण होऊ नये, यासाठी सीमा भिंत बांधण्यासाठी १४ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेतून महापालिका ८१ टाक्या बांधणार आहे. त्यापैकी ५१ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. १९ टाक्यांची कामे सुरू आहेत तर ११ टाक्यांचे काम रद्द झाले आहे.
पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी अत्याधुनिक पाणी मीटर, विद्युत यंत्रणा, स्वयंचलित व्हॉल्व लावण्यात आले आहेत. तेथे लहान खोल्याही तयार केल्या आहेत. पण तिथे संरक्षक भिंत अथवा सुरक्षारक्षक नसल्याने मद्यपी तसेच उपद्रवींकडून साहित्याचे नुकसान केले जाते.
अनेक जण टाकीवर जाऊन मद्यपान करत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व टाक्यांभोवती उंच सीमाभिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टेंडर काढले असून, ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे.