SPPU Chowk
SPPU Chowk Tendernama
पुणे

Pune : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? महापालिका की पीएमआरडीए?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह उड्डाणपुलाचे ठिकठिकाणी काम सुरू असल्याने रस्ते बॉटलनेक (निमुळते) झाले आहेत. महापालिकेचे रस्ता रुंदीकरणाचे कामही अद्याप अर्धवट आहे.

सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी आनंद ऋषिजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) सिग्नलला वाहने चार ते पाच वेळा अडकून पडत आहेत. रुग्णवाहिकेलाही जागा मिळत नाही. अवघ्या दीड ते दोन किलोमीटरच्या प्रवासाला जवळपास पाऊण तास लागत असल्याने नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. पण दुसरीकडे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA), महापालिका (PMC) या अडचणी सोडविण्याऐवजी स्वतःच अडचणींचा पाढा वाचत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

पीएमआरडीएने शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे काम सुरू केले आहे. मेट्रोच्या कामाला गती आलेली असताना गणेशखिंड रस्त्यावर इस्क्वेअरपासून आनंद ऋषीजी चौकाच्या पुढे पाषाण रस्ता व बाणेर रस्त्यावर उड्डाण पूल बांधला जाणार आहे. त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. त्याच वेळी वर्षभरापासून विद्यापीठ चौक ते रिझर्व्ह बँकेदरम्यानचा असलेला ३६ मीटरचा रस्ता ४५ मीटरचा करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. खासगी बंगले, इमारती, शासकीय संस्था यांच्याशी संवाद साधून हे काम सुरू केले असले तरी अद्याप ते अपूर्ण आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून येथील उड्डाण पुलाचे काम सुरू झाले असून, ऑगस्ट २०२४ पर्यंत ते पूर्ण केले जाईल, असे ‘पीएमआरडीए’कडून सांगितले जात आहे. उड्डाण पुलाच्या कामासाठी बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेश खिंड रस्ता येथे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ चौकाच्या जवळपास एकाच वेळी चार ठिकाणी कामे सुरू झाल्याने या ठिकाणी बॉटेलनेक तयार झाला आहे.

अशी होते चारही बाजूंनी कोंडी

- विद्यापीठाकडून सेनापती बापट रस्त्याकडे वळताना तीन ठिकाणी जागा. यामुळे शिवाजीनगरकडून येणारी वाहतूक मधेच अडते. पर्यायाने चौकात वाहतूक कोंडी होते.

- विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर औंध रस्ता आणि बाणेर रस्त्यावर मेट्रोचे काम संथगतीने सुरू. त्यामुळे आनंद ऋषीजी चौकात रस्ते छोटे झाले आहेत. त्यामुळे चारही दिशांनी येणारी वाहतूक अडते.

- सेनापती बापट रस्त्याकडून विद्यापीठाकडे येणाऱ्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. पर्यायाने पाठीमागे जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलपर्यंत वाहतूक कोंडी होते.

- औंध रस्त्याकडून शिवाजीनगरकडे येणारी वाहतूक मागे केंद्रीय विद्यालयापर्यंत आणि बाणेर-बालेवाडीकडून येणारी वाहतूक मागे बाणेर फाट्यापर्यंत जाम झालेली असते.

- शिवाजीनगरकडून विद्यापीठाकडे जाताना सेंट्रल मॉलपासूनच कोंडीचा सामना करावा लागतो.

या आहेत उपाययोजना

- गणेशखिंड रस्त्याचे रुंदीकरण तातडीने पूर्ण करणे

- आनंद ऋषीजी चौकात जास्तीत जास्त जागा मोकळी करणे आणि वाहतुकीचा वेग वाढविणे

- जेथे काम नाही, अशा ठिकाणचे अनावश्‍यक बॅरिकेड्स काढणे

- दुचाकी वाहनांसाठी शक्य तेथे पर्यायी आणि स्वतंत्र मार्गिकेची गरज

पर्यायी मार्ग गरजेचाच

१) औंधकडून शिवाजीनगरकडे जाताना चतुःशृंगी पोलिस ठाणे- पुणे विद्यापीठ - व्यामनिकॉममधून पर्यायी मार्ग होऊ शकतो. त्यावर चर्चादेखील झाली आहे. पुढे कार्यवाही नाही.

२) शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक रेंजहिल्समधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर काढणे शक्य

३) सेनापती बापट रस्त्याकडून बाणेर-बालेवाडीकडे जाणारा मॉडर्न महाविद्यालयामधील पर्यायी रस्ता गरजेचा. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे रस्ता रखडला.

४) शिवाजीनगरकडून औंधला जाण्यासाठी कृषी महाविद्यालयातून थेट रेंजहिल्सपर्यंतचा रस्ता खुला करण्याचा प्रस्ताव. महाविद्यालयाकडून परवानगीची प्रतीक्षा.

पुणे शहरात माझे कार्यालय आहे. त्यामुळे नेहमीच्या वेळेपेक्षा अधिकचा एक तास गृहीत धरूनच घराबाहेर पडावे लागते. गणेशखिंड रस्त्यावर किती वेळ अडकून पडेल, याची खात्री नाही. अनेकदा रुग्णवाहिका अडकतात. या रस्त्यावरील प्रवास आता असह्य झाला आहे. हे काम वेगात पूर्ण केले पाहिजे.

- रामदास बडे, पिंपळे गुरव

माझा स्वतःचा टेम्पो असून, शहरात माल पोहचविण्यासाठी जावे लागते. पण विद्यापीठ चौकातील वाहतुकीत नेहमी बदल होतो. मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने माल पोहचविण्यास उशीर होत आहे. तसेच बाहेर गावच्या वाहनचालकांना तर कुठला रस्ता कुठे जातो, हेच कळत नसल्याने रस्ता चुकतात. यासाठी उपाययोजना आवश्‍यक आहे.

- शीतलकुमार जोगदंड, औंध

आनंद ऋषीजी चौकात दुमजली उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस, वॉर्डन प्रयत्न करत आहेत. हे काम करताना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास होणार आहे. कृषी महाविद्यालयातून पर्यायी मार्ग केला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे, त्यास मान्यता मिळाल्यानंतर कोंडी कमी करता येईल.

- राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए

काही खासगी बंगल्यांच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. एक इमारत पाडावी लागणार आहे. त्या कामासाठी काही काळ लागणार आहे. पण इतर रस्ता रुंदीकरणाची कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करू.

- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, महापालिका

गणेशखिंड रस्ता, विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, औंध रस्ता येथे वाहतूक पोलिस, वॉर्डनकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णवाहिकांना रस्ता करून देण्यासाठीही प्रयत्न केला जातो. पण एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला आहे.

- शफील पठाण, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा