Sambhajinagar
SambhajinagarTendernama

Chhatrapati Sambhajinagar : सातारा देवळाईकरांसाठी संक्रातीला गोड बातमी! 400 वर्षांपूर्वीच्या 'या' देवस्थानाच्या विकासाचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील ऐतिहासिक सातारा भागात असलेल्या ऐतिहासिक खंडोबा मंदिराचा पुरातत्व विभागाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जीर्णोद्धार होत असतानाच आता सातारा - देवळाई भागातील नागरिकांसाठी दुग्धशर्करा योग आणणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सातारा गावाच्या अंतर्गत ९ किलोमीटर अंतरावरील कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानास "क" वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने आता राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेतून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sambhajinagar
Narendra Modi : 'ब्रॅन्ड नाशिक'साठी केंद्राचा मेगा प्लॅन; 60 कोटींची तरतूद अन् मोदींचा रोड शो

यासाठी पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या देवस्थानास
'क' वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा बहाल केला आहे.

खंडोबाचे मूळस्थान कडेपठार आहे. मात्र, तेथील जीर्ण अवस्थेत मंदिर असून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. येथे खंडोबा, म्हाळसा, बानू यांची शिळा आहे. तसेच चारही बाजूंनी दगडी शिळाचे बांधकाम आहे. पण, मंदिराची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. सालाबादप्रमाणे यात्रेनिमित्त खंडोबा मंदिरापासून ते कडेपठारपर्यंत पालखी काढली जाते. तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, वीज पाण्याची सोय नाही. यामुळे सरकारने कडेपठार खंडोबा मंदिर देवस्थानास "क" वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास निधी द्यावा, अशी पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली होती.

ही मागणी पूर्ण झाल्याने सोलापूर - धुळे महामार्गापासून सातारा तांडा ते कडेपठारपर्यंत डोंगरकपारीतून जाणाऱ्या ९ किलोमीटरच्या कच्च्या रस्त्याचे नशीब उजळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटर रस्त्यासाठी बांधकाम विभागाने एक कोटी रुपये मंजूर केले असून रस्ते कामाची वर्क ऑर्डर राजेंद्र वरकड यांना देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी रुपये देखील मंजूर झाले असून सोलापूर धुळे महामार्गापासून ते सातारा तांडा ते कडेपठारपर्यंत रस्ता गुळगुळीत केला जाणार आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : साताऱ्यातील 'या' प्रमुख रस्त्याचा मार्ग मोकळा

कडेपठारावर वीजपुरवठा पुरवठा करण्यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी महावितरण कंपनीकडून १ के.डब्लू लोडचे नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करून घेतला. कडेपठारावर नविन उच्चदाब व लघुदाब वाहिनीसह २५ KWA क्षमतेचे रोहित्र स्थापनेचे काम छत्रपती संभाजीनगर येथील मे. श्री. लिनिअर इंटरप्रायझेस कनेक्शन कंपनीला देण्यात आले आहे.

देवस्थानाच्या कामात वनविभागाची वनवन

सदर काम पूर्ण करण्यासाठी महावितरणचे शहर विभाग क्रमांक - १ चे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत ८ ऑगस्ट २०२३ पासून वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालयाकडे ना - हरकत मागत आहेत. मात्र तीन महिन्यांपासून सदर कार्यालय टाळाटाळ करत आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी वन विभागातील जमिनीवर १ के.डब्लू लोडचे नवीन कनेक्शन बसविण्यासाठी नविन उच्चदाब व लघुदाब वाहिनीसह २५ KWA क्षमतेचे रोहित्र बसविण्यासाठी कंत्राटदार कंपनीला ना - हरकत आवश्यक आहे. मात्र या देवस्थानाच्या कामासाठी देखील वनविभाग आडकाठी दाखवत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. हे काम मार्गी लागल्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत कडेपठारावर जलकुंभ आणि कडेपठाराच्या खालीच कांचनवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र होत असल्याने देवस्थानात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Sambhajinagar
Nashik : जल जीवनच्या योजनांसाठी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय; आता ग्रामपंचायतींचे वीजपंपांचे देयक...

काय आहे कडेपठार?

खंडोबाची देशभरात १८ देवस्थाने आहेत. त्यापैकी सातवे स्थान हे श्री क्षेत्र खंडोबा कडेपठार आहे. खंडोबाच्या वर्षभरातून चार यात्रा होतात. चैत्री, पौषी, श्रावणी आणि माघी अशा या चार यात्रा असतात. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील भाविकांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा गावातील कडेपठार खंडोबाचे देवस्थान लोकप्रिय आहे. 

सातारा गावातील हेमाडपंती मंदिर बांधण्याआधीचे ते खंडोबाचे मूळ मंदिर हे कडेपठार येथे आहे. यात्रेनिमित्त खंडोबा मंदिरातून खंडेरायाची पालखीत वाजत गाजत मिरवणूक कठेपठारापर्यंत निघते. पौष महिन्यात सातारा गावातील खंडोबा मंदिरात आरती झाल्यानंतर कडेपठार खंडोबा देवस्थानात महाआरती होते.

Tendernama
www.tendernama.com